मुंबई - अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी महाघाडीच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून नवनीत राणा २०१९ मध्ये खासदार बनल्या होत्या. भाजपा-शिवसेना युती असताना, मोदींच्या लाटेतही नवनीत राणांनी शिवसेना नेत्याचा पराभव करत अमरावतीची निवडणूक जिंकली. मात्र, यंदा राज्यातील राजकीय समिकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले असून महाविकास आघाडीही उदयास आली आहे. त्यामुळे, नवनीत राणांच्या भूमिकेकडे व अमरावतीच्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, नवनीत राणा यांचा भाजपा प्रवेश निश्चिच झाल्याचे समजते. लवकरच त्यांचा भाजपा प्रवेश होईल.
नवनीत राणा यांनी महाआघाडीच्या पुरस्कृत उमेदवार बनून निवडणूक जिंकली असली तरी गेल्या ५ वर्षात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचे समर्थन केले आहे. राज्यातील भाजपा नेत्यांच्या बाजुनेच त्यांनी सातत्याने भूमिका मांडली असून भाजपा आणि शिवसेना यांच्यातील लढाईत शिवसेनेविरुद्ध आक्रमक पवित्राही घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे, भाजपकडून त्यांना यंदा संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच, राणा दाम्पत्याने मोदी सरकारच्या कामाचे अनेकदा कौतुक केले आहे. तर, उघडपणे भाजपाचे समर्थनही केल्यांच दिसून आलं. त्यामुळे, यंदा भाजपाच्या तिकीटावर त्यांना संधी मिळू शकतेय
खा. नवनीत राणा यांचा ४ एप्रिल रोजी नागपुरात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. कारण, अमरावतीमध्ये यंदा त्यांना कमळाच्या तिकिटावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे, निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच हा प्रवेश होणार असल्याचे समजते. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अमरावती लोकसभेत भाजपचा उमेदवार असेल, असे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजप या जागेवर कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट झाले. तर, विद्यमान खासदार नवनीत राणा यांनाच पक्षात घेऊन कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची भाजपाची योजना आहे.
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी, राम मंदिर, हनुमान चालिसा, हिंदुत्व या मुद्दयांवरुनही संसदेत आणि रस्त्यावरही कणखरपणे भूमिका मांडल्या आहेत.