CoronaVirus News : नवनीत, रवी राणा यांना अखेर डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 04:47 AM2020-08-17T04:47:26+5:302020-08-17T16:22:36+5:30
खा. नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती लीलावती रुग्णालय प्रशासनाने दिली. खासदार नवनीत राणा यांच्या तब्येतीत शनिवारी सुधारणा झाली. त्यांना अतिदक्षता विभागामधून बाहेर हलवले होते. त्यानंतर प्रकृती सुधारल्याने शनिवारी रात्री उशिरा त्यांच्यासह पती रवी राणा यांना डिस्चार्ज देण्यात आला.
खा. नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सासू, सासरे, दोन मुले, आमदार राणा यांचा समावेश आहे. ६ ऑगस्टपासून नवनीत राणा व त्यांच्या पतीवर नागपूर वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. खा. नवनीत यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानंतर १३ ऑगस्टला नागपूरहून त्यांना व त्यांच्या पतीला वांद्रेतील लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले होते.
२३ तासांचा प्रवास करून नवनीत राणा १४ ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचल्या होत्या. त्यानंतर, शनिवारी १५ ऑगस्टला त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानं त्यांना आयसीयूमधून सामान्य कक्षात आणण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी व्हिडीओमधून आपल्या तब्येतीविषयी माहिती दिली होती. "आज मला आयसीयूमधून सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले आहे, आता माझी प्रकृती थोडी स्थिर आहे, आपण सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे, मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार" असे नवनीत राणा यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होतं.