Join us

Navneet Ravi Rana vs Shivsena: उद्या सकाळी ८ वाजता ‘मातोश्री’वर जमा व्हा; महिला शिवसैनिक, विभाग प्रमुखांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 6:18 PM

राणा दाम्पत्यांनी शिवसेनेला दिलेल्या आव्हानानंतर मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले.

मुंबई – राज्यात हनुमान चालीसा पठण करण्यावरून शिवसेना आणि राणा दाम्पत्य आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार रवी राणा(Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा दोघंही मुंबईत पोहचले आहेत. त्यानंतर राणा दाम्पत्यांनी पत्रकार परिषद घेत शनिवारी म्हणजे उद्या सकाळी ९ वाजता मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आव्हान दिले आहे. त्यावरून शिवसैनिक संतप्त झाले आहेत.

राणा दाम्पत्यांनी शिवसेनेला दिलेल्या आव्हानानंतर मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांविरोधात घोषणाबाजी केली. आता शनिवारी सकाळी ८ वाजता मातोश्री बाहेर एकत्र या असा आदेश मुंबईतील विभाग प्रमुख आणि महिला शिवसैनिकांना देण्यात आले आहे. राणा दाम्पत्यांना विरोध करण्यासाठी शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घराबाहरे मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा म्हणणारच असा राणा दाम्पत्य म्हणाले आहेत. यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील वर्षा बंगल्याहून मातोश्रीवर दाखल झाले आहेत. त्यांनी जमलेल्या शिवसैनिकांचे आभार मानले आहेत. 

त्याचसोबत शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, राणा दाम्पत्याचा शिखंडीसारखा वापर करून भाजपा शिवसेनेवर वार करतेय परंतु शिवसेनेचा बाण तुम्हाला चांगलाच लागेल असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. तर बंटी बबली हे स्टंटबाज आहे. हिंदुत्वाची मार्केटिंग करण्याची गरज नाही. भाजपाला सी ग्रेड नटांची गरज असते असं सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यांना इशारा दिला आहे.

शिवसैनिकांची झोप उडाली! नवनीत राणांना घराबाहेर पडू देणार नाही

राणा दाम्पत्य शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा म्हणणार आहेत. या दोघांना घराबाहेर न पडण्याची पुरती मोर्चेबांधणी शिवसैनिकांनी केली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना बाहेर पडू न देण्यासाठी शिवसैनिक त्यांच्या खार येथील घराबाहेर जमू लागले आहेत. या शिवसैनिकांनी आम्ही रात्रभर इथेच राहणार असून राणा मुंबई सोडून जात नाहीत तोवर रस्त्याच्या दोन्ही बाजुला खडा पहारा देणार असल्याचे सांगितले. तसेच राणा जोवर मुंबई बाहेर जात नाहीत, तोवर असाच पहारा देणार असल्याचे ते म्हणाले. मातोश्रीच्या रस्त्यावर एक पाय पुढे टाकून दाखवावे, आम्ही काय करू शकतो ते उद्या दाखवू, असा इशाराही या शिवसैनिकांनी दिला आहे.

टॅग्स :नवनीत कौर राणाउद्धव ठाकरेशिवसेना