'नवनीतजी, आधी खासदारकीचा राजीनामा द्या, मग नैतिकतेचा पुळका दाखवा'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 08:25 AM2021-03-23T08:25:15+5:302021-03-23T08:27:10+5:30
नवनीत राणा यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेली स्फोटकांनी भरलेली गाडी, त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या, पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांची बदली, त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप अशा घटनांच्या मालिकेमुळे ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. आता यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत आपल्याला धमकी दिल्याचा आरोप अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खासदार कौर यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिलाय.
नवनीत राणा यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संसदेत भाषण करताना ठाकरे सरकारवर सवाल उपस्थित केले. त्यानंतर अरविंद सावंत यांनी मला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली, असा आरोप राणा यांनी केला आहे. तू महाराष्ट्रात कशी फिरते, ते मी पाहतो, अशा शब्दांत सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी उडी घेतली आहे. नवनीत राणा ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे त्यांनी म्हटलंय. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ आणि नवनीत कौर यांना सल्ला दिलाय.
महाराष्ट्रात राहुन शासनाधिकृत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता अनधिकृत अशा PM Care Fund ला मदत केली जे आज हिशोब मागितला तरी द्यायला तयार नाहीत यापेक्षा मोठा महाराष्ट्रद्रोह होऊच शकत नाही @NCPspeaks@TV9Marathi@zee24taasnews@MiLOKMAT@saamTVnews@abpmajhatv@LoksattaLive
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 23, 2021
''नवनीतजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा. कारण, तुम्ही आज खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे, ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे, याची आठवणही चाकणकर यांनी करुन दिलीय.
नवनीतजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा , कारण आज तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 22, 2021
वाघ यांना सल्ला
महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या नावाचा वापर करून तुम्ही ज्यांना पाठीशी घालत आहात त्यांना एकच प्रश्न विचारा चित्रा वाघ, की आज तुम्ही गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या हक्काचा GST निधी मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले. महाराष्ट्रात राहून शासनाधिकृत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता अनधिकृत अशा PM Care Fund ला मदत केली. ज्याचा आज हिशोब मागितला तरी द्यायला तयार नाहीत, यापेक्षा मोठा महाराष्ट्रद्रोह होऊच शकत नाही, असा सल्ला चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना दिलाय.
काय म्हणाल्या चित्रा वाघ
व्वा रे बहाद्दर.... महाराष्ट्र नावावर करून घेतलात की काय? विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या, धमक्या कसल्या देताय, असा प्रश्न अरविंद सावंत यांना चित्रा वाघ यांनी विचारलाय. तसेच, आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी आहोत तुमच्या सारख्यांच्या धमक्यांना घाबरणाऱ्या नाहीत, असे म्हणत आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत नवनीत कौर ताई, असेही त्यांनी म्हटलंय.
सावंतांनी आरोप फेटाळले
ठाकरे सरकारवरील टीकेनंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचा दावा नवनीत कौर यांनी केलाय. मात्र, सावंत यांनी हे आरोप फेटाळले आहेत. मी राणा यांना धमकी का देईन? मी त्यांना धमकी दिली की नाही, हे तिथे उपस्थित असलेले लोकदेखील सांगू शकतील. राणा यांची देहबोली आणि त्यांचे शब्द चुकीचे होते, असं सावंत म्हणाले. त्यावर मी कसं आणि काय बोलायचं हे ते मला सांगणार का, असा सवाल राणा यांनी विचारला.