Join us

आरोग्याची काळजी घेऊन करा नवरात्रीचे उपवास; वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 3:29 AM

नवरात्रीत अनेक भाविक उपवास धरतात. नऊ दिवस काही जण केवळ पाणी पिऊन उपवास करतात, तर काही जण दिवसभर उपाशी राहून रात्री एकवेळेस जेवतात. पण, उपवास करताना काळजी घेतली पाहिजे.

मुंबई : नवरात्रीत अनेक भाविक उपवास धरतात. नऊ दिवस काही जण केवळ पाणी पिऊन उपवास करतात, तर काही जण दिवसभर उपाशी राहून रात्री एकवेळेस जेवतात. पण, उपवास करताना काळजी घेतली पाहिजे. या काळात दिवसा उष्मा व रात्री थंडावा असतो. याचा परिणाम प्रतिकारशक्तीवर होत असल्याने पचण्यास सोपे असेच खाद्यपदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, उपवासाच्या काळात अनेक जण पचण्यास जड पदार्थ खातात. या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेऊन त्यानंतर नऊ दिवस उपवास करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.शरीराला कष्ट देऊन हे उपवास केले जात असल्याने अशक्तपणा येणे, चक्कर येणे, गरगरणे, तोंडाला कोरड पडणे, पोटात दुखणे अशा आरोग्य धोक्यात येण्याच्या घटनाही पाहायला मिळतात. तेव्हा नवरात्रीचे उपवास करत असलेल्यांनी ठरावीक गोष्टींचे पालन केले पाहिजे. याविषयी आहारतज्ज्ञ डॉ. नेहा कौशिक यांनी सांगितले की, निर्जळी उपवास करीत असाल तर पाणी, लिंबू सरबत, शहाळे, ग्रीन टी, ताक हे तासातासाला पेलाभर घेत राहावे. उपवासात दिवसातून २ लीटर द्रव पदार्थ घेतल्यास गरगरणे, चक्कर येणे, तोंडाला कोरड पडणे असे त्रास होत नाहीत. उपवासासाठी दिवसभर अजिबात काही खायचे नाही किंवा उपासाचे पदार्थ रोज फक्त एकदाच खायचे, असे न करता दिवसातून ३-४ वेळा हे उपवासाचे पदार्थ अगदी थोड्या प्रमाणात खावेत.डॉ. राजेश संघवी यांनी सांगितले की, या काळात दिवसा उष्मा व रात्री गारवा असल्याने हे हवामान जीवाणू व विषाणूंच्या वाढीस प्रचंड पोषक असते. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. उपवासामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात. सात्त्विक अन्न घेतल्याने शरीर शुद्ध होते व मनाला तरतरी येते. पण, वजन कमी करण्यासाठी उपवास करणे अजिबात हितावह नाही. उपाशी राहिल्याने वजन कमी होत नाही. उपवासाच्या काळात अनेक जण पिष्टमय पदार्थ आवडीने खातात. त्यात अनेकदा फायबर नसतात. उपवासाचे अनेक पदार्थ तुपात शिजविले जातात ते पचायला अतिशय जड असतात. त्यामुळे अ‍ॅसिटीडीची आणि नंतर पचनाची समस्या निर्माण होण्याची भीती असते.मधुमेहींनी घ्यावी विशेष काळजीरक्तात साखरेचे प्रमाण ७० मिली ग्रॅमपेक्षा कमी असेल तर उपवास करू नये, असे सांगण्यात आले आहे.तसेच टाइप २ मधुमेह असलेल्या व्यक्तींनी हे उपवास करण्यास हरकत नाही. पण तरीही या दिवसात डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांच्या प्रमाणात काही बदल करावेत.उपवास सुरू करण्याआधी फळ, डाळी, धान्य, कडधान्ये असा प्रोटीनयुक्त आहार घ्यावा, असा सल्लाही यात देण्यात आला आहे.उपवासात पाणी पिणे वर्ज्य असेल तर उपवास सुरू होण्याआधीच द्रवपदार्थांचे सेवन करावे.इन्सुलिन घेणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांना विचारूनच या दिवसांत कमी-जास्त मात्रा घ्याव्यात.

टॅग्स :नवरात्रीआरोग्यहेल्थ टिप्स