नवरात्रोत्सव मंडळांची लगबग सुरू, पूजाअर्चेसाठी मुंबईत परप्रांतीय भटजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 01:27 PM2023-10-12T13:27:49+5:302023-10-12T13:28:52+5:30
गणेशोत्सव असो पितृपक्ष असो किंवा नवरात्र असो या काळात मागणी अधिक आणि पुरोहित कमी अशी स्थिती नेहमी पाहायला मिळते. अनेकदा तर, गुरुजी ऐन वेळी येतच नाहीत, चौकशी केल्यानंतर गुरुजी दुसऱ्या ठिकाणी पूजेत व्यस्त असल्याचे अनुभव यजमानांना येतात.
मुंबई : पितृपक्षानंतर अनेकांना नवरात्रीचे वेध लागले आहेत. नवरात्रीत घट कधी बसवायचे, पूजाअर्चा कशी करायची याबाबत अनेक नवरात्रोत्सव मंडळांची लगबग सुरू आहे. या धार्मिक विधींसाठी पुरोहितांची आवश्यकता असते एकाचवेळी अनेक ठिकाणांहून त्यांना मागणी असल्याने पुरोहित वेळेवर मिळत नाहीत. आता मात्र परिस्थिती बदलली असून पूजाअर्चा करण्यासाठी परराज्यातले भटजी मुंबईत स्थिरावले आहेत.
गणेशोत्सव असो पितृपक्ष असो किंवा नवरात्र असो या काळात मागणी अधिक आणि पुरोहित कमी अशी स्थिती नेहमी पाहायला मिळते. अनेकदा तर, गुरुजी ऐन वेळी येतच नाहीत, चौकशी केल्यानंतर गुरुजी दुसऱ्या ठिकाणी पूजेत व्यस्त असल्याचे अनुभव यजमानांना येतात.
भटजी येतात कुठून?
मुंबईत धार्मिक विधी करणारे पुरोहित तसे कमीच आहेत. गेली काही वर्षे श्रावणातच उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान येथून पुरोहित महाराष्ट्रात काही महिन्यासाठी येतात आणि दसऱ्यानंतर जातात. कोकण, मराठवाडा, विदर्भ येथूनही भटजी मुंबईत येतात.
नवरात्रोत्सवात या केल्या जातात विधी
- नवरात्रोत्सवात दुर्गा सप्तशती, शतचंडी किंवा सहस्त्र चंडी, श्रीसुक्त पाठ, नवारण मंत्र जप, ललिता पंचमी, षष्ठी व्रत, हवन केले जाते.
- काही सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात देवीची सकाळ संध्याकाळ पुरोहितांकडून पूजा केली जाते.
- नवमी, दशमी वेळी दोन किंवा तीन पुरोहितांकडून हवन केले जाते. अशी माहिती पुरोहित लक्ष्मण पारेकर यांनी दिली.
धार्मिक विधींसाठी...
नवरात्रीत विविध धार्मिक विधींसाठी वेगवेगळे पैसे आकारले जातात. केवळ घटस्थापना करायची असल्यास ११०० ते २१०० रुपये तर हवन करायचे असल्यास ३ ते ५ हजार तर नवरात्रीत दशमीपर्यंत सकाळ संध्याकाळ पूजन करायचे असेल तर १५ ते २१ हजार रुपये आकारतात.
घेतात जादा दक्षिणा
पुरोहितांच्या अपुऱ्या संख्येचा फायदा काही भटजी घेताना आढळतात. काही वेळा दक्षिणा वाढवून मागितली जाते, असा सूर काही मुंबईकर व्यक्त करतात. पूजाविधी रखडू नये म्हणून यजमानांना गुरुजींना जास्त रक्कम मोजावीच लागते.
मुलुंड येथील हनुमान चौक जय भवानी मित्र मंडळाकडून नवरात्रीत स्थापनेपासून धार्मिक विधी आमच्याकडून केले जातात. आता आमचा मुलगा धार्मिक विधी करतो. पर राज्यातून आणि इतर जिल्ह्यातून पुरोहित मुंबईत येतात, ही चांगली बाब आहे. त्यामुळे विधी मुहूर्तावर होतात.
- लक्ष्मण पारेकर, पुरोहित