Join us

Navratri : वरळी कोळीवाड्याची देवता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 12:17 AM

वरळी कोळीवाड्याचे आराध्यदैवत म्हणून गोलफादेवी ओळखली जाते. पूर्वेला माहिमची खाडी व पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र यांच्या सान्निध्यात गोलफादेवी वसली आहे.

- राज चिंचणकरमुंबई : वरळी कोळीवाड्याचे आराध्यदैवत म्हणून गोलफादेवी ओळखली जाते. पूर्वेला माहिमची खाडी व पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र यांच्या सान्निध्यात गोलफादेवी वसली आहे. वरळी गावात पसरलेल्या कोळीवाड्यात एका टेकडीवर गोलफादेवीचे पुरातन दगडी मंदिर आहे. या मंदिरात गोलफादेवीसह साकबादेवी व हरबादेवी यांचेही स्थान आहे. या मंदिरात या तिन्ही देवतांचे एकत्र दर्शन होते.देवींच्या या मूर्ती पाषाणाच्या आहेत. त्यांच्या बाजूला रक्षक आहेत. गोलफादेवीच्या गळ्यात मोत्यांची माळ असून, हातात बांगड्या, जपमाळ व फूल आहे. साकबादेवीच्या ललाटी चंद्रकोर व हातात बांगड्या आहेत. हरबादेवीच्या एका हातात ताट आहे.वरळी कोळीवाड्यात गोलफादेवीला कौल लावल्याशिवाय कोणतेही शुभकार्य केले जात नाही. नवरात्रौत्सवात पहिल्या दिवशी देवीला महावस्त्रालंकार परिधान करून घटस्थापना केली जाते आणि अष्टमीच्या दिवशी होमहवन केले जाते. कोळीवाड्यात दाटीवाटीने वसलेल्या घरांमधूनही गोलफादेवीचे मंदिर उठून दिसते. गोलफादेवी मंदिरासह कोळीवाड्यात पापविमोचनेश्वराचे पुरातन मंदिर आहे. वेताळेश्वर व वेशीवरच्या चेडेदेवाची मंदिरेही येथे आहेत. वरळीचा किल्लाही येथून जवळच आहे. पौष पौर्णिमेला गोलफादेवीची यात्रा भरविण्यात येते. ही यात्रा वरळी कोळीवाड्याचा मोठा उत्सव समजला जातो. 

टॅग्स :नवरात्री