उत्सव आदिशक्तीचा..! पुन्हा एकदा ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा ‘मराठी’ दांडिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 11:35 AM2023-10-15T11:35:57+5:302023-10-15T11:36:41+5:30

उत्सव आदिशक्तीचा...जागर मराठी मनाचा अशी घोषणा करत भाजपाने मराठी मतदारांना आकर्षित केले आहे

Navratri Special: Once again BJP Mumbai Organised 'Marathi' Dandiya in Uddhav Thackeray's stronghold area Kalachowki, lalbaug | उत्सव आदिशक्तीचा..! पुन्हा एकदा ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा ‘मराठी’ दांडिया

उत्सव आदिशक्तीचा..! पुन्हा एकदा ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा ‘मराठी’ दांडिया

मुंबई – नवरात्रीनिमित्त मुंबईत सगळीकडे उत्साहाचे वातावरण असून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा भाजपानंमराठी दांडियाचे आयोजन केले आहे. गेल्यावर्षी या दांडियाला सुरुवात झाली होती. यंदा मराठी दांडियाचे दुसरे वर्ष आहे. अभ्युदय नगर काळाचौकी हा ठाकरेंचा बालेकिल्ला असून येथील मैदानात मुंबई भाजपाकडून १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या काळात आयोजित करण्यात आला आहे.

भाजपाच्या या मराठी दांडियाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमते, त्याठिकाणी बॉलिवूड सेलिब्रिटीसह अनेक मराठी कलाकार हजेरी लावतात. मराठी दांडियाच्या निमित्ताने भाजपाकडून मुंबईतील मराठी लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो. मराठी दांडिया महोत्सवात अनेक मराठी कुटुंब उत्साहाने सहभागी होतात. मराठी आणि इतर भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठी दांडियाचे आयोजन करून भाजपाने लालबाग, परळ, काळाचौकी या मराठीबहुल भागात या दांडियाचे आयोजन केले आहे.

उत्सव आदिशक्तीचा...जागर मराठी मनाचा अशी घोषणा करत भाजपाने मराठी मतदारांना आकर्षित केले आहे. गायक अवधुत गुप्ते आणि टीमकडे मराठी दांडिया महोत्सवाचं काम आहे. लालबाग, परळ, वरळी, काळाचौकी हा उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो. याठिकाणी आदित्य ठाकरे, अजय चौधरी हे ठाकरे गटाचे आमदार आहेत. परंतु याच बालेकिल्ल्यात मराठी लोकांना आकर्षिक करण्यासाठी भाजपाने गेल्यावर्षी पहिल्यांदा मराठी दांडिया आयोजित केला होता. त्याला मोठा उत्स्फुर्त प्रतिसादही मिळाला होता. त्यामुळे यंदा पुन्हा भाजपाने मराठी दांडिया कार्यक्रम ठेवला आहे.

दरम्यान, मुंबईत नवरात्रीनिमित्त दांडिया उत्सवाला राजकीय रंग आला आहे. नवरात्रौत्सव मंडळांना आपल्याकडे खेचण्यासाठी राजकीय मंडळींची चढाओढ असते. दांडियात मोठ्या प्रमाणात तरुणाई असते. त्याला आपल्याकडे खेचण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न असतो. यंदा भाजपा-शिवसेना, ठाकरेगटासह सर्वच पक्षांनी आघाडी घेतली आहे. त्यात मराठी लोकांना आकर्षिक करण्यासाठी भाजपाने काळाचौकी इथं तर ठाकरे गटाने विक्रोळी इथं मराठी दांडियाचे आयोजन केले आहे.

Web Title: Navratri Special: Once again BJP Mumbai Organised 'Marathi' Dandiya in Uddhav Thackeray's stronghold area Kalachowki, lalbaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.