कोविड लढ्यासाठी नौदल, हवाई दल आले धावून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 02:03 AM2021-05-08T02:03:38+5:302021-05-08T02:04:19+5:30
भारतीय हवाई दलाच्या सी-१७ या अजस्र मालवाहू विमानाने आतापर्यंत ऑक्सिजन कंटेनर आणि वैद्यकीय उपकरणांसाठी केलेल्या देशांतर्गत उड्डाणांची संख्याच ४०० आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविडच्या दुसऱ्या लाटेने देशभरात आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला आहे. ऑक्सिजनसह अन्य वैद्यकीय साधनांसाठी भारतीय नौदल आणि हवाई दलाने पुढाकार घेतला आहे. देशविदेशातून साहित्य आणताच त्या इच्छितस्थळी तातडीने पोहोचविण्यासाठी दोन्ही दलांकडून एकत्रित प्रयत्न सुरू आहेत.
भारतीय हवाई दलाच्या सी-१७ या अजस्र मालवाहू विमानाने आतापर्यंत ऑक्सिजन कंटेनर आणि वैद्यकीय उपकरणांसाठी केलेल्या देशांतर्गत उड्डाणांची संख्याच ४०० आहे. यापैकी ३५१ उड्डाणे ही तब्बल ४ हजार ९०४ मेट्रिक टन क्षमतेचे २५२ ऑक्सिजन टँकर्स आणण्यासाठी केली गेली. जामनगर, भोपाळ, चंदिगड, पानगढ, इंदूर, रांची, आग्रा, जोधपूर, बेगमपेट, भुवनेश्वर, पुणे, सूरत, रायपूर, उदयपूर, मुंबई, लखनऊ, नागपूर, ग्वाल्हेर, विजयवाडा, बडोदा, दिमापूर आणि हिंडन या शहरांमध्ये ही उड्डाणे झाली. याशिवाय १ हजार २५२ रिकाम्या ऑक्सिजन सिलिंडरसोबत १ हजार २३३ मेट्रिक टन क्षमतेची ७२ क्रायोजेनिक ऑक्सिजन स्टोरेज कंटेनर्स परदेशातून भारतात आणण्यात आले. त्यासाठी ५९ आंतरराष्ट्रीय उड्डाणे झाली. सिंगापूर, दुबई, बँकॉक, ब्रिटन, जर्मनी, बेल्जियम आणि ऑस्ट्रेलिया येथून खरेदी करण्यात आलेल्या सिलिंडर आणि कंटेनर आणण्यासोबतच सी - १७ आणि आयएल-७६ या विमानांतून इस्रायल आणि सिंगापूरमधून क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर्स, ऑक्सिजन जनरेटर्स आणि व्हेंटिलेटर्स आणण्याची जबाबदारीही हवाई दलाने पार पाडली.
आयएनएस शार्दुल, जलाश्वचा वापर
भारतील नौदलाने मित्र देशांकडून ऑक्सिजन कंटेनर्स, सिलिंडर्स, कॉन्सेंट्रेटर्स आणि इतर उपकरणे आणण्यासाठी आपल्या युद्धनौका कामाला लावल्या आहेत. आयएनएस तलवार, आयएनएस कोलकाता, आयएनएस ऐरावत, आयएनएस कोची, आयएनएस तबर, आयएनएस त्रिकंद, आयएनएस जलाश्व आणि आयएनएस शार्दुल या जहाजातून विविध देशांतून वैद्यकीय उपकरणे आणली जात आहेत. येत्या काही दिवसांत दोहा, कुवैत व मुआरा, ब्रुनेई येथून ऑक्सिजन कंटेनर्स आणि इतर वैद्यकीय सामग्री अनुक्रमे आयएनएस तर्कश, आयएनएस शार्दुल आणि आयएनएस जलाश्वमधून भारतात दाखल होतील.