Join us

भरतीला भिडणार नौदल, तटरक्षक अन् अग्निशमन दल; समुद्रकिनारी जीवरक्षकही तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 1:31 PM

पर्जन्यमापन केंद्रे देणार सूचना.

लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला तब्बल २५ दिवस मोठी भरती येणार असून, जून ते सप्टेंबर दरम्यान तब्बल ४.८० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे भरतीच्या काळात तसेच मुसळधार पावसात मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे. पावसाळ्यात खासकरून वीकेंडला समुद्रकिनारी जाण्याचा मोह होऊ शकतो. अशावेळी कुणाचा समुद्रात बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडू नये, यासाठी ६ समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षकांसह अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान, पोलिस पेट्रोलिंग वाहने तैनात असणार आहेत. 

पावसाळ्यात पूरस्थिती, दरडी कोसळणे, पाणी भरणे, झाडांच्या फांद्या तुटून पडणे यासारख्या आपत्कालीन घटनांमुळे मुंबईकरांची दाणादाण उडते. मात्र, या दरम्यान मुंबईकरांना तत्काळ आवश्यक तेथे, हवी ती मदत मिळावी यासाठी पालिका प्रशासनाने आपल्या विविध यंत्रणा नागरिकांच्या उपलब्धतेसाठी अलर्ट मोडवर ठेवल्या आहेत. नागरिकांसाठी पालिकेच्या आपत्कालीन प्रशासन विभागाकडून विविध विभागस्तरीय यंत्रणांशी समन्वय ठेवून तत्काळ मदत मिळेल, असा प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून समुद्रावरील सुरक्षिततादेखील विचारात घेऊन नागरिकांनी समुद्रात प्रवेश करून अपघात घडू नयेत, याकरिता समुद्रावर धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत. याशिवाय पालिकेने अग्निशमन दल, नौसेना, तटरक्षक दल यांच्याशी समन्वय साधून आवश्यक सूचना दिल्या आहेत.

समुद्र किनारी जाऊच नका

त्वरित मदतीसाठी कुलाबा, वरळी, मालाड, मानखुर्द आणि घाटकोपर येथे नौदलाची ५ पूर बचाव पथके तैनात असून, नौदलाचे १ पाणबुडी पथक कुलाबा येथे तर २ पथके उरण येथे तैनात आहेत. याशिवाय कुलाबा येथे चेतक व सी-किंग नावाचे हेलिकॉप्टर आणि आपत्कालीन प्रसंगी शोध व बचाव कार्यासाठी एक स्वतंत्र जहाज तैनात ठेवण्यात आले आहे.  भारतीय तटरक्षक दलाची ही ४ पथके मान्सून कालावधीदरम्यान सज्ज ठेवण्यात आली आहेत. ही पथके कुलाबा, वरळी व मानखुर्द येथे तैनात आहेत.

- समुद्राला येणाऱ्या भरती-ओहोटीच्या वेळा व लाटांची उंची- कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान अंदाज - मुंबई शहर व उपनगरात होत असलेल्या पावसाचा दर १५ मिनिटांचा अद्ययावत अहवाल- पाणी तुंबल्यामुळे वळविण्यात आलेल्या वाहतुकीची माहिती- लोकल ट्रेन्सची वाहतूक विलंबाने होत असल्यास त्याबाबतची रेल्वे नियंत्रण कक्षाकडून प्राप्त अद्ययावत माहिती- विमानतळावरील विमानांच्या आवागमनावर काही परिणाम झाला असल्यास त्याची माहिती

पर्जन्यमापन केंद्रे कार्यान्वित 

मुंबई शहर व उपनगरात ६० ठिकाणी ६० स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. या पर्जन्यमापन केंद्रांद्वारे दर १५ मिनिटांचा अहवाल नागरिकांच्या माहितीकरिता आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या संकेतस्थळावर स्वयंचलित पद्धतीने नियमित स्वरूपात अद्ययावत केला जातो. या हवामानदर्शक यंत्रणेची अद्ययावत माहिती बाह्य यंत्रणेमार्फत उभारण्यात आलेल्या इंटरनेट क्लाऊडवर नोंदविण्यात येते व क्लाऊडमार्फत ही माहिती नियंत्रण कक्ष व नागरिकांना आपत्कालीन व्यवस्थापनच्या संकेतस्थळ व मोबाइल  ॲपद्वारे उपलब्ध करण्यात येते.

 

टॅग्स :पाऊस