Join us

नव्या नायर-सचिन सावंतचा कोचीत रंगला भेटींचा सिलसिला; ईडीच्या तपासात माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 6:54 AM

सावंत याने नवी मुंबईत घेतलेला फ्लॅट देखील भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमावलेल्या पैशांतून खरेदी केल्याचा दावा ईडीने केला आहे.

मुंबई : भ्रष्टाचाराच्या माध्यमातून संपत्ती गोळा केल्याच्या आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अटकेत असलेला भारतीय महसूल सेवेतील अधिकारी (आयआरएस) सचिन सावंत याचे अनेक कारनामे पुढे येण्यास सुरुवात झाली असून, दाक्षिणात्य अभिनेत्री नव्या नायरला भेटण्यासाठी तो किमान २० वेळा कोचीला गेल्याची माहिती पुढे आली आहे. 

सावंत याने भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या पैशांतूनच त्याने या अभिनेत्रीवर भेटींचा वर्षाव केल्याचेही समजते. उपलब्ध माहितीनुसार, सावंत याचे नवी मुंबईत घर आहे. त्याच इमारतीमध्ये अभिनेत्री नव्या नायर देखील राहात होती. त्या दोघांमध्ये असलेल्या मैत्रीची चर्चा देखील होती. काही काळानंतर नव्या नायर केरळमधील कोची येथे वास्तव्यास गेली. त्यानंतर सावंत किमान २० वेळा तिला भेटण्यासाठी कोची येथे गेल्याचे तपासादरम्यान आढळून आले. तसेच, त्याने एका भेटीदरम्यान तिला १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे अँकलेट (पायात घालण्याचा दागिना) देखील भेट दिल्याचे दिसून आले. हा दागिना त्याने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमावलेल्या पैशांतूनच दिल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे.

आलिशान गाडीसाठी पैसे कुठून आणले?सावंत यांने सांगली नजीकच्या एका गावात सव्वा एकर जमीन खरेदी केली आहे. त्या खरेदीच्या पैशांचा स्रोत काय? याचा देखील ईडीचे अधिकारी तपास करत आहेत. तर, १६ लाख रुपयांची एक आलिशान गाडी खरेदी करण्यासाठी त्याने पैसे कुठून आणले, याबाबतही त्याला विचारणा होत आहे. दरम्यान, सावंत याचा दादर येथील आलिशान फ्लॅट, सांगली जिल्ह्यातील जमीन आणि त्याची आलिशान गाडी ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे.

सावंत याने नवी मुंबईत घेतलेला फ्लॅट देखील भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमावलेल्या पैशांतून खरेदी केल्याचा दावा ईडीने केला आहे. सावंत याने काही वर्षांनी हा फ्लॅट विकून दादर येथे एक मोठा फ्लॅट घेतला. मात्र, त्याची नोंदणी किंमत १ कोटी ७७ लाख इतकी कमी दाखवल्याचेही ईडीचे म्हणणे आहे.

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालय