Join us

धीरे धीरे प्यार को बढाना है... नवाब मलिक यांचं संजय राऊतांसाठी खास ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 9:38 AM

नागरिकत्व विधेयकाच्या मतदानावेळी शिवसेनेने मतदानापासून तटस्थ राहण्याची भूमिका घेऊ शकली असती.

मुंबई - सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ पाहायला मिळाली. एकेकाळचे मित्रपक्ष असलेले भाजपा शिवसेना एकमेकांच्या विरोधात गेले आहेत तर कधीकाळचे विरोधक आज हातात हात घेत सत्तेत एकत्र बसले आहेत. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या विभिन्न विचारधारेचे पक्ष राज्यात सत्तेत आले आहेत. मात्र महिनाभराच्या सत्तासंघर्षामध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन शेरोशायरीच्या अंदाजात राजकीय भाष्य करुन रंगत आणत आहे. 

अलीकडेच नवाब मलिक यांनी ट्विट करत शिवसेना नेते संजय राऊत यांना टॅग केलं आहे त्यात त्यांनी म्हटलंय की, धीरे धीरे प्यार को बढ़ाना है, हद से गुजर जाने है. नवाब मलिकांच्या या ट्विटचा रोख शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यातील जवळीक आणखी वाढविण्यासाठी संकेत दिले असल्याचं बोललं जातं आहे. 

सध्या देशात नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन रणकंदण माजलं आहे. लोकसभेत हे विधेयक ३११ मताने मंजूर झालं असलं तरी राज्यसभेत विधेयक पास करण्यासाठी सरकारची कसोटी लागणार आहे. मात्र या सगळ्यांमध्ये शिवसेनेची भूमिका संभ्रमाची असल्याने नवाब मलिकांनी हे ट्विट केलं असावं अशी चर्चा सुरु आहे. लोकसभेत शिवसेनेने केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करत हे विधेयक राष्ट्रहिताचं असल्याचं सांगितले. मात्र शिवसेनेच्या या भूमिकेवर काँग्रेसने जाहीर नाराजी व्यक्त केली. 

नागरिकत्व विधेयकाच्या मतदानावेळी शिवसेनेने मतदानापासून तटस्थ राहण्याची भूमिका घेऊ शकली असती. शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केले हे योग्य नाही अशी नाराजी काँग्रेस खासदार हुसेन दलवाईंनी बोलून दाखविली. समाजात फूट पाडण्यासाठी नागरिकत्व विधेयक आणलं गेलं आहे. बेरोजगारी, आर्थिक मंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न असे अनेक महत्त्वाचे प्रश्न देशासमोर आहेत. मात्र या मुद्दयांवर मार्ग काढण्यापेक्षा समाजात तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप हुसेन दलवाईंनी केला आहे. विधेयक संविधानाला धरुन नाही. भाजपा राज्यघटना मानत नाही असंही त्यांनी सांगितले.

तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही अप्रत्यक्षरित्या शिवसेनेच्या भूमिकेवर टीका करत ज्या पक्षाने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आहे ते भारतीय संविधानाच्या मूळावर घाव घालतायेत अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर शिवसेनेने या विधेयकाबाबत राज्यसभेत सावध भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र सत्तेत आहेत. एकमेकांची साथ देण्यासाठी काहीवेळी मर्यादेच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा अशा प्रकारे अप्रत्यक्ष संदेश नवाब मलिकांनी ट्विटमधून शिवसेना दिला असावा असचं सध्यातरी दिसतंयं. 

टॅग्स :नवाब मलिकसंजय राऊतशिवसेनाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस