Nawab Malik : अमृता फडणवीसांनी सांगितलं राज'कारण', त्या फोटोवर दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 09:56 PM2021-11-01T21:56:22+5:302021-11-01T21:57:27+5:30

मी स्वत: एनजीओशी कनेक्टेड आहे, रिव्हर मार्च ही सार्वजनिक चळवळ होती, त्यासाठी यांनी मला कॉन्टॅक्ट केला. मुंबईतील 4 नद्या ज्यांना आपण आज नाले म्हणतो. त्या नद्यांबाबत मला त्यांनी अगोदर माहिती दिली

Nawab Malik : Amruta Fadnavis describes the photo shared by Malik as 'cause' | Nawab Malik : अमृता फडणवीसांनी सांगितलं राज'कारण', त्या फोटोवर दिलं स्पष्टीकरण

Nawab Malik : अमृता फडणवीसांनी सांगितलं राज'कारण', त्या फोटोवर दिलं स्पष्टीकरण

googlenewsNext
ठळक मुद्देरिव्हर मार्च मूव्हमेंट उभारण्याची गरज व्यक्त केली. त्यानंतर, मी या मूव्हमेंटसाठी जोडले, असे सांगत मी राजकारणी नसून मी समाजसेविका असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

मुंबई - मंत्री नवाब मलिक यांनी सकाळी ट्विटरवर देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो ट्विट केला. त्यानंतर भाजपाचे ड्रग्स पेडलरशी काय कनेक्शन? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांवर आरोप लावले. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन नवाब मलिकांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं होतं. आता, अमृता यांनी पत्रकार परिषद घेत मलिकांचे आरोप फेटाळले असून त्यांच्यावर पलटवार केला आहे.

मी स्वत: एनजीओशी कनेक्टेड आहे, रिव्हर मार्च ही सार्वजनिक चळवळ होती, त्यासाठी यांनी मला कॉन्टॅक्ट केला. मुंबईतील 4 नद्या ज्यांना आपण आज नाले म्हणतो. त्या नद्यांबाबत मला त्यांनी अगोदर माहिती दिली. मिठी, दहीसर, भोईसर आणि ओशीवाडा या चार नद्यांना मी भेट दिली. त्या नद्या खराब होत असल्याचं मी प्रत्यक्ष जावून पाहिलं. धोबीघाटच्या परिसराला मी भेट दिली, तेथील घाण, ती परिस्थिती पाहून मला रडू आलं. त्यानंतर, मी आप्पापाडा येथील क्रांतीनगर परिसराला भेट दिली. तेथील झोपडपट्टी राहणाऱ्या नागरिकांशीही चर्चा केली. मुंबईतील या 4 नद्या काय आहेत, फक्त पिलर, प्लास्टीक आणि प्रदुषणयुक्त या नद्या आहेत. त्यामुळे, रिव्हर मार्च मूव्हमेंट उभारण्याची गरज व्यक्त केली. त्यानंतर, मी या मूव्हमेंटसाठी जोडले, असे सांगत मी राजकारणी नसून मी समाजसेविका असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितलं. रॅली फॉर रिव्हर्स यांच्या कार्यक्रमातून ईशा फाऊंडेशनचे जग्गी वासूदेव या गुरुजींसाठी एक गाणं म्हटलं. त्यावेळी सचिन गुप्ता आणि जयदीप राणा यांनी रिव्हर्स मार्चसाठी योगदान देण्याचं सांगितलं, त्यातून ते मूव्हमेंटशी जोडले गेल्याचं अमृता यांनी सांगितलं.

मी सोशल एक्टीव्हीस्ट, मला मध्ये आणू नका

तुम्हाला बिघडे नवाब व्हायचं आहे, तुम्हाला बिघडे नवाबची जी एनर्जी आहे ती सुधरे नवाबमध्ये कन्व्हर्ट करा, तरंच महाराष्ट्र पुढे जाईल. अन्यथा आपलं खरं नाही. मलिक जाणीवपूर्वक आम्हाला टार्गेट करत आहेत, आमच्याकडे ना लँड बँक आहे, ना साखर कारखाने आहेत, त्यामुळे आम्ही कोणाला घाबरत नाही, असेही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक हे बेनकाब होत आहेत, काही सूचत नाही, निगेटीव्हीटी आलेली असते तेव्हा असं केलं जातं. सरळ मार्गाने जाणाऱ्या महिलांना का डिवचता, तेच आज माझ्यासोबत केलं जातंय. तुम्ही मर्द आहात ना मग देवेंद्रजींना डायरेक्ट टार्गेट करा, मला मधी नका आणू. मी एज ए सोशल एक्टीव्हीस्ट म्हणून माझे विचार प्रकट करत असते, आणि ते यापुढेही करता राहणार, असेही अमृता फडणवीस यांनी ठणकावून सांगितलंय.  

नवाब मलिक काय म्हणाले?

ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांचे नदी संरक्षणाबाबत एक गाणं आले होते. त्या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही काम केले होते. तर अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गायन केले होते. त्या गाण्याच्या निर्मितीसाठीचा फायनान्शियल हेड म्हणून जयदीप राणा काम पाहत होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीसांवर साधला निशाणा

देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज पेडलर यांच्यासोबत संबंध आहेत. या सगळ्या खेळामध्ये प्रतीक गाभा हा मुख्य खेळाडू असून, त्याच्याबाबत उलगडा लवकरच करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांचा वाझे असून, त्याचा उद्धव ठाकरेंशी संबंध नाही. मात्र युती सरकारमध्ये भाजपा आणि शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर नीरज गुंडे फडणवीस यांचा निरोप घेऊन उद्धव ठाकरेंकडे जात होता, असा दावा मलिक यांनी केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध आहेत. फडणवीसांच्या संरक्षणानेच राज्यात ड्रग्सचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिकांनी(Nawab Malik) केला आहे. मुंबई क्रुझवर NCB ने केलेल्या कारवाईनंतर राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. यातील तपास अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्यावर मलिकांनी निशाणा साधला होता. त्यानंतर आता हे प्रकरण भाजपाशी जोडले गेले आहे. त्यास आता अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. तसेच, ज्या व्यक्तीसोबत त्यांचा फोटो शेअर करण्यात आला त्याबद्दलही त्यांनी सांगितलंय.
 

Web Title: Nawab Malik : Amruta Fadnavis describes the photo shared by Malik as 'cause'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.