Nawab Malik: 'अनिल देशमुख मराठा असल्याने लगेच राजीनामा, मग नवाब मलिक तुमचे कोण?'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 02:58 PM2022-03-12T14:58:51+5:302022-03-12T14:59:48+5:30
नवाब मलिक(Nawab Malik) आणि दहशतवाद्यांचा जो जमीन व्यवहार झाला त्यामागे सूत्रधार दाऊदची बहीण हसीना पारकर ही होती
मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या सुटकेचे भवितव्य येत्या मंगळवारी ठरणार आहे. मलिक यांनी केलेल्या हेबिअस कॉर्पस याचिकेत सुटकेसंदर्भात केलेली अंतरिम मागणी मान्य करायची की फेटाळायची? यावरील निर्णय उच्च न्यायालयाने शुक्रवारी राखून ठेवला. मात्र, मलिक यांना अटक झाल्यापासून भाजप आक्रमक झाली असून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. आता, भाजप नेते निलेश राणे यांनीही मलिकांच्या राजीनाम्यावर थेट शरद पवारांनाच प्रश्न विचारले आहेत.
नवाब मलिक(Nawab Malik) आणि दहशतवाद्यांचा जो जमीन व्यवहार झाला त्यामागे सूत्रधार दाऊदची बहीण हसीना पारकर ही होती. या पैशाचा वापर मुंबईत ३ बॉम्बस्फोट घडवण्यासाठी झाला. काळ्या पैशातून जमीन खरेदी करून टेरर फंडिंग केले गेले. या टेरर फंडिंगमध्ये महाराष्ट्रातला मंत्री मदत करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्हाला एकदिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यावं लागेल. कुणाच्या दाढ्या कुरवाळताय? तुम्ही मलिकांचा राजीनामा घेतला नाही, तरी आमचा संघर्ष सुरूच राहील असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनावेळी दिला. मलिक यांच्या राजीनाम्यासाठी फडणवीस यांच्यासह संपूर्ण भाजप आक्रमक झाली आहे. आता, निलेश राणेंनीही मलिकांचा राजीनामा मागितला आहे.
मराठा समाजाच्या अनिल देशमुखांचा राजीनामा लगेच घेतला, मग नवाब मलिक यांचा राजीनामा अद्याप का घेतला नाही. दाऊदसारख्या देशाचा दुश्मन असलेल्या व्यक्तीच्या माणसांशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मलिकांना राजीनामा घेतला पाहिजे, असे निलेश राणे यांनी म्हटले. तसेच नवाब मलिक शरद पवारांचे कोण आहेत?, मला कधी कधी संशय येतो की शरद पवार हेच दाऊतचा माणूस आहेत, असा गंभीर आरोपही निलेश राणेंनी केला आहे.
सुप्रिया सुळेंनी मलिक यांची प्रकृती पाहण्यासाठी भेटायचं म्हणत तत्परता दाखवली. ती तत्परता, काळजी अनिल देशमुखांवेळी कोठे होती, असा प्रश्नही निलेश यांनी केला. नवाब मलिक हे पवार कुटुंबीयांसाठी काही स्पेशल आहेत का, नवाब मलिक शरद पवारांबद्दल काही बोलेन, अशी भिती तर नाही ना?, अशी संशयांस्पद शंकाही निलेश राणेंनी विचारली आहे. दरम्यान, ईडीची कारवाई आणि विशेष न्यायालयाने दिलेल्या कोठडीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या नवाब मलिक यांच्या हेबिअस कॉर्पस याचिकेवर शुक्रवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यानंतर, न्या. पी.बी. वराळे व न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवला. मंगळवारी निर्णय देऊ, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
काय आहे ईडीचं म्हणणं
ईडीच्या म्हणण्यानुसार, मलिक यांनी दाऊदकडून मालमत्ता खरेदी केली. मलिक यांच्या मालकीची सॉलिडस इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. च्या माध्यमातून दाऊदकडून ३ कोटी ५४ लाख बाजारभाव असलेली मालमत्ता अवघ्या २० लाख रुपयांत खरेदी केली. मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीने आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली. ईडीने नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी आणि विशेष न्यायालयाचा आदेश रद्द करावा, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.