मुंबई - राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात नेले आहे. तिथे सकाळपासून त्यांची चौकशी करण्यात आली. भल्या पहाटे ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर, विरोधकांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मलिक यांना अटक केल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करुन मलिक आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
मलिक यांना ईडीने सकाळी ताब्यात घेतल्यानंतर चौकशीअंती त्यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून अटक करण्यात आली. त्यानंतर, सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात नवाब मलिक यांना हजर केले असून सुनावणी सुरू झाली. मलिक यांना १४ दिवसांच्या कोठडीची मागणी ईडीने कोर्टाकडे केली आहे. मात्र, मला समन्स न देता बोलावले आहे आणि ईडीने मला घरीच ताब्यात घेतल्याचे मलिक यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. पण, मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेते सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत. कुणी फडणवीसांच्या भूमिकेचं कौतूक करतंय, तर कुणी महाविकास आघाडीतील पुढील कोणत्या नेत्यांचा नंबर लागणार, यावर भाष्य करतंय.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर चर्चेत आलेले मुंबईतील भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करुन मलिक कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. तसेच, एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसला चॅलेंजच दिले आहे. मलिक यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांच्या नावाने असलेल्या लाल गठ्ठ्यांचा फोटो शेअर करत, जसे जसे हे लाल गठ्ठे उघडतील, तसे तेसे मियाँ नवाब मलिक यांचे कांड देशासमोर येतील, असे ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय.
कंबोज यांनी संजय राऊतांनाही लक्ष्य केलं आहे. महाभारतातील एक श्लोक ट्विट करुन राऊत यांच्या ट्विटला कंबोज यांनी प्रत्युत्तर दिलय. साहेब, दहशतवादाला साथ देणारे कंस आणि रावण नेहमीच मारले गेले आहेत, यापुढेही मारले जातील, असे कंबोज यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत
नवाब मलिकांचा राजीनामा घेऊ नये, असं मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत ट्विट करत म्हणाले की, महाविकास आघाडीशी समोरा- समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या. एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच कंस आणि रावण सुध्दा मारले गेले...हेच हिंदुत्व आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.