Ajit Pawar ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आणि आमदारांची बैठक काल पार पडली. अजित पवारांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर नेते हजर होते. या बैठकीला पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक हेदेखील हजर होते. भाजपकडून मलिक यांच्या महायुतीतील प्रवेशाला जाहीरपणे विरोध करण्यात आलेला असताना अजित पवारांनी मलिक यांना बैठकीस बोलावल्याने महायुतीत पुन्हा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामुळे अटकेची कारवाई झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिक हे जामिनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. तुरुंगाबाहेर येताच नवाब मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आपलं समर्थन दिलं होतं. तसंच अधिवेशन काळात ते सत्ताधारी बाकांवरही बसले होते. मात्र गंभीर आरोप असलेले मलिक हे महायुतीसोबत नकोत, अशी भूमिका घेत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना पत्र लिहिलं होतं. हे पत्र सार्वजनिक करण्यात आल्याने अजित पवार काहीसे नाराजही झाले होते. मात्र त्यानंतर मलिक यांना पक्षाच्या बैठकांपासून दूर ठेवण्यात आलं. परंतु आता पुन्हा एकदा नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर झाल्याने अजित पवारांनी भाजपचा विरोध झुगारून नवाब मलिकांना पुन्हा पक्षासोबत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवारांना लिहिलेल्या पत्रात फडणवीसांनी काय म्हटलं होतं?
"नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो" असं म्हणत नवाब मलिकांना महायुतीपासून दूर ठेवा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
राष्ट्रवादीच्या बैठकीत काय झालं?
अजित पवारांनी देवगिरी या आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत आमदारांसोबत विधानपरिषद निवडणुकीबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. तसंच लोकसभा निवडणुकीत आलेलं अपयश दूर सारून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, याबाबत कालच्या बैठकीत चर्चा झाली आहे. तसंच या 'डिनर डिप्लोमसी'च्या माध्यमातून पक्ष एकसंध ठेवण्याचा प्रयत्नही अजित पवारांकडून सुरू असल्याचं बोललं जात आहे.