Join us

Nawab Malik: नवाब मलिक खरेच आजारी आहेत हे आधी पटवून द्या, अन्यथा...; मुंबई हायकोर्टाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 4:09 PM

Nawab Malik: नवाब मलिकांच्या जामीन अर्जाला ईडीतर्फे हायकोर्टात जोरदार विरोध करण्यात आला.

Nawab Malik: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी नवाब मलिक खरेच आजारी असल्याचे पटवून द्या, असे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने नवाब मलिक यांचा अर्ज नुकताच फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला मलिकांकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

नवाब मलिकांची एक किडनी निकामी झाली आहे. ते सध्या एकाच किडनीवर आहेत. मात्र, तरीही ईडी त्यांच्या रुग्णालयातील डिस्चार्जसाठी घाई करत आहे, असा दावा अमित देसाई यांनी नवाब मलिकांतर्फे केला. नवाब मलिक हे गेल्या अनेक महिन्यांपासून कुर्ला येथील क्रिटी केअर रुग्णालयामध्ये दाखल आहेत. मात्र, किडनी ट्रान्सप्लांटसाठी त्यांना अन्य मोठ्या रूग्णालयात उपचार सुरू करायचे आहेत, अशी माहिती त्यांनी उच्च न्यायालयाला दिली. 

नवाब मलिक खरेच आजारी आहेत हे आधी पटवून द्या

नवाब मलिकांच्या जामिनावर तातडीने सुनावणी हवी असल्यास ते खरेच आजारी आहेत हे आधी आम्हाला पटवून द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. अन्यथा तुम्हाला वाट पाहावी लागेल कारण तुमच्या आधी आलेली बरीच प्रकरण अद्याप प्रलंबित आहेत, अशी स्पष्ट भूमिका न्या. मकरंद कर्णिक यांनी व्यक्त केली. नवाब मलिकांच्या जामीन अर्जाला ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी जोरदार विरोध केला. मलिक हे पीएमएलए कायद्यातील कलम ४५ मधील तरतुदीनुसार आजारी नाहीत, असा दावा करण्यात आला. यावर उच्च न्यायालयाने नवाब मलिकांच्या जामीनावरील सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब करत २१ फेब्रुवारीच्या सुनावणीत दोन्ही बाजूंच्या वकिलांना केवळ मलिकांच्या वैद्यकीय स्थितीवर युक्तीवाद करण्याचे निर्देश दिले .

दरम्यान, नवाब मलिक यांनी वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन जामिनासाठी अर्ज केला होता. तेव्हा, ईडीने मलिक यांचे वैद्यकीय चाचणीचे अहवाल मागितले होते. मात्र, ईडीच्या मागणीला मलिक यांनी विरोध केला. मलिक हे गंभीररित्या आजारी असतील तर त्यांनी स्वतःहून तपासयंत्रणेला अहवाल देणे आवश्यक होते. मलिक यांच्या वैद्यकीय स्थितीचा अहवाल सादर न केल्यामुळे तसेच वैद्यकीय मंडळाने मलिक यांची तपासणी न केल्यामुळे हा जामीन अर्ज फेटाळण्यात येत आल्याचे विशेष न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मुंबई हायकोर्टनवाब मलिकअंमलबजावणी संचालनालय