मुंबई - भाजपमधील नेत्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप करत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता (Amruta Fadnavis) यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर, फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलं. तर, भाजप नेतेही संतापले असून मंत्री मलिक यांच्यावर निशाणा साधत आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आता मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलंय.
क्रूझवरील ड्रग्स पार्टीवरून (Cruise Drug Party) एनसीबी विरुद्ध एनसीपी असा सुरू असलेला संघर्ष आता वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री नवाब मलिक यांना थेट इशारा दिला आहे. तर, केशव उपाध्ये यांनी मलिक यांना मुख्यंत्री उद्धव ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लक्ष देण्याचं सूचवलं आहे.
महाविकास आघाडीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून बेछुट आरोप सुरू केले आहेत. समीर वानखेडेंवर आरोप करताना त्यातून होणाऱ्या परिणामाची काळजी करावी. पण, यामध्ये भारतीय जनता पक्षाला ओढण्याचे, आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचे परिणाम खूप भोगावे लागतील, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. तसेच, पुराव्याशिवाय आपण जेव्हा बोलतो, तेव्हा पुरावे न सापडल्यास वाईट स्थिती होते, असेही ते म्हणाले.
मलिक आणि फडणवीसांमध्ये जुंपली
देवेंद्र फडणवीस यांचे ड्र्ग्स माफियांशी संबंध आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रात ड्रग्सचा खेळ सुरू आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुरुवात नवाब मलिक यांनी केली आहे. आता शेवट मी करणार. त्यांनी लवंगी लावली, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे. नवाब मलिक यांचं अंडरवर्ल्डशी असलेलं कनेक्शन उघड करणार असून, त्याचे पुरावे शरद पवार यांनाही देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.