Sanjay Raut: सत्य बोलतायेत, त्यांच्यामागे ईडी, सीबीआय लावली जातेय; संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 10:54 AM2022-02-23T10:54:26+5:302022-02-23T10:54:51+5:30
जे सत्य बोलतात किंवा भाजपचे जिथे सरकार नाहीय तिथे ईडीच्या तपास यंत्रणा लावल्या जातात असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई – महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. दहशतवाद्यासोबत जमीन व्यवहार केल्याप्रकरणी मलिकांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. बुधवारी पहाटे ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहचले. त्यानंतर नवाब मलिक स्वत: ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. मात्र या प्रकारावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपावर हल्लाबोल सुरू केला आहे.
या प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले की, नवाब मलिक किंवा आम्ही सातत्याने बोलतोय, सत्य बोलतोय त्यांच्यामागे ईडी सीबीआय मागे लावले जातेय. चौकशी होईल आणि संध्याकाळी घरी येतील. माझे सर्वांशी बोलणे झाले. चौकशी होऊ शकते. राज्याच्या एक मंत्र्यांला ईडी चौकशीसाठी बौलावले जाते. किरीट सोमय्यांनी ईडीकडे हे प्रकरण दिलं आहे. भाजपा नेत्यांची आम्ही सगळी प्रकरणे ईडीकडे देणार आहोत. भाजपा व्यतिरिक्त सर्व पक्षासाठी ईडी आहे का? असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच जे सत्य बोलतात किंवा भाजपचे जिथे सरकार नाहीय तिथे ईडीच्या तपास यंत्रणा लावल्या जातात. माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले. २०२४ नंतर चित्र वेगळे असेल. मलिक कॅबिनेट मंत्री आहेत. मलिक सत्य बोलत आहेत, त्यांना चौकशीसाठी नेले आहे, हे महाराष्ट्र सरकारसमोर आव्हान आहे. २०२४ नंतर आम्ही सुद्धा तुमच्या मागे अशा तपास यंत्रणा लावू असा इशारा खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.
NCP leader and Maharashtra Minister Nawab Malik arrives at the office of the Enforcement Directorate in Mumbai. Details awaited.
— ANI (@ANI) February 23, 2022
(File photo) pic.twitter.com/vYMmvovKsQ
हा सत्तेचा दुरुपयोग – राष्ट्रवादी काँग्रेस
नवाब मलिकांवर कारवाई प्रकरणी जयंत पाटील(Jayant Patil) यांनी भाजपाला टार्गेट केले आहे. जयंत पाटील म्हणाले, हा पुन्हा एकदा सत्तेचा दुरुपयोगाचा प्रकार आहे. कोणतीही नोटीस न देता राज्यातील एका मंत्र्यांना घेऊन जाणे ही सर्वच गोष्टीची पायमल्ली आहे. हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध व्यक्त केले आहे. अलीकडच्या काळात नवाब मलिक यांनी अनेक प्रकरणे बाहेर काढली होती, त्याची प्रतिक्रिया म्हणून कदाचित जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. वेळोवेळी त्यावर आवाज उठवला होता म्हणून कदाचित नवाब मलिक यांना अडचणीत आणण्याचे काम असेल. जाणीवपूर्वक नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचं काम सुरू झालं आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला.