Devendra Fadnavis On Nawab Malik: मुंबई ड्रग्ज प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यावर फडणवीसांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असं म्हटलं होतं. अखेर आज देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिकांनी अंडरवर्ल्डशी संबंधित आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा खळबळजनक दावा फडणवीसांनी केला आहे. यासाठी फडणवीसांनी पुराव्यांदाखल जमीन व्यवहाराची कागदपत्रं देखील पत्रकार परिषदेत सादर केली. इतकंच नव्हे, हे सर्व पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि संबंधित यंत्रणेकडे देणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. फडणवीसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिकांनी कुर्ल्यात केलेल्या जमीन खरेदीबाबतचे व्यवहार उघड केले आहेत.
फडणवीसांनी नवाब मलिकांवर केलेले आरोप-
- १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी असलेल्या सरदार शाह वली खान हा सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर टायगर मेमनच्या नेतृत्वात बॉम्ब कुठे ठेवायचे याची रेकी केली गेली होती. तसंच मेमनच्या घरी गाड्यांमध्ये आरडीएक्स भरणारे हे होते. तसंच या स्फोटाप्रकरणी संपूर्ण माहिती त्याला होती. याच व्यक्तीच्या मालकीची कुर्ल्यातील ३ एकर जागा नवाब मलिकांच्या कंपनीनं विकत घेतली आहे.
- सलीम पटेल व्यक्ती तो दाऊदचा खास म्हणून ओळखला जातो आणि हसिना पारकरचे संपूर्ण व्यवहार तो पाहतो. त्याच्या नावानं पावर ऑफ अॅटर्नी तयार व्हायच्या. कुर्ल्यात एलबीएस रोडवर गोवावाल्याची जागा होती. सलीम पटेलने त्याची पॉवर ऑफ अॅटर्नी घेतली.
- कुर्ल्यातील प्राइम लोकेशनची जमीन ज्याची पावर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल आणि जमीनीचा दुसरा भाग शाहवली खान याच्या नावाने आहे. या दोघांनीही तीन एकरची जागा सॉलीडस नावाच्या कंपनीला विकली. या कंपनीच्या वतीनं ज्या करारावर स्वाक्षरी केली गेली ती फराज मलिक यांची आहे. आजही ही कंपनी मलिक यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे.
- स्वत: नवाब मलिक सॉलीडस कंपनीच्या संचालकपदी राहिले आहेत. मंत्री झाल्यानंतर त्यांनी कंपनीच्या पदाचा राजीनामा दिला. पण त्याहीमागे एक मोठा आर्थिक घोटाळा दडला आहे.
- सॉलीडस कंपनीला कुर्ल्याच्या एलबीएस रोडवरील मोक्याची जागा अवघ्या २५ रुपये स्वेअर फूट दरानं कशी काय विकली गेली? त्यातही केवळ १५ रुपये प्रती स्वेअर फूट दरानं पेमेंट झालेलं आहे. म्हणजेच ही जागा केवळ ३० लाख रुपयांत विकली गेली. नवाब मलिक या कंपनीत २०१९ पर्यंत होते.
- ३० लाखात एलबीएस रोडवर ३ एकर जमीन खरेदी झाली. पॉवर ऑफ अर्टनीमध्ये टेनंट वेगळा, रजिस्ट्रीवेळी वेगळा, किंमत कमी दाखवण्यासाठी हे केलं गेलं. याची किंमत ३.५० कोटी दाखवली. रजिस्ट्री कमी दाखवण्यासाठी हे केलं गेलं. रेडी रेकनर ८५०० रु. स्वे.मीटर, तर मार्केट रेट 2 स्वेअर फूट असताना, खरेदी झाली केवळ २५ रुपये स्वे.फूट या कवडीमोल दरानं. त्यातही केवळ १५ रुपये स्वे.फूट दरानं पेमेंट झालं आहे.
- कुर्ल्याच्या इतक्या मोक्याच्या जागेचा रेडी रेकनर ८,५०० रुपये स्वे.फूट असताना मलिकांना २५ रुपये स्वे.फूट दरानं जमीन कशी मिळाली? त्याही पेक्षा मोठा प्रश्न म्हणजे ज्यांनी मुंबईला हादरवलं, लोकांच्या चिंधड्या उडवल्या अशा बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन नवाब मलिकांनी का घेतली?
- अंडरवर्ल्डच्या लोकांची संपत्ती टाडा कायद्याअंतर्गत जप्त केली जाऊ नये म्हणूनच मंत्री मलिकांनी व्यवहार केले का? असाही आरोप फडणवीसांनी केला आहे.
- २००३ साली हे सर्व व्यवहार सुरू झाले आणि व्यवहार २००५ रोजी संपला तेव्हा नवाब मलिक मंत्री होते. तेव्हा सलीम पटेल कोण आहे? हे नवाब मलिकांना माहिती नव्हतं का? मुंबईच्या गुन्हेगारांकडून, मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? आणि असं काय होतं की एवढी महागडी जमीन तुम्हाला 20 लाखात मिळाली? त्याला कारण या गुन्हेगारांवर टाडा लागला होता. टाडा कायद्यानुसार गुन्हेगारांची सगळी प्रॉपर्टी जप्त होते. त्यामुळेच यांची प्रॉपर्टी जप्त होऊ नये म्हणून तर हा व्यवहार झाला नाही ना. यात सरळ अंडरवर्ल्डसोबत संबंध दिसून येतो, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय.
- नवाब मलिकांच्या कुटुंबीयांची ही केवळ एकच मालमत्ता नाही. तर अशा पाच मालमत्ता मला सापडल्या आहेत. त्यातील ४ मालमत्तांमध्ये १०० टक्के अंडरवर्ल्डचा अँगल आहे, असाही आरोप फडणवीसांनी केला आहे.