Join us

'फडणवीस दाम्पत्यांविरुद्ध 3 वर्षांपूर्वीच ईडीकडे तक्रार, मात्र....'; NCP आमदाराची टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 11:20 AM

राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन फडणवीस दाम्पत्यांवर अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मलिक यांच्या अटकेविरुद्ध महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले असून केंद्र सरकारकडून सुडाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिकाही महाविकास आघाडीने घेतली आहे. आता, भाजप नेत्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विचारला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन फडणवीस दाम्पत्यांवर अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. अॅक्सीस बँकप्रकरणाची तक्रार ईडीकडे 3 वर्षांपूर्वीच देण्यात आली होती. पण, अद्यापही दोघांपैकी एकालाही ED ने बोलावले नाही. ED कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय? असा प्रश्न मिटकरी यांनी विचारला आहे. '4 सप्टेबर 2019 म्हणजे 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोहनिश जबलपुरे यांनी ॲक्सिस बँक नुकसानीचा सप्रमाण लेखाजोखा ED कडे सादर केला, त्याचा हा पुरावा. या तीन वर्षात दोघांपैकी एकालाही ED ने बोलावले नाही.  ED कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय?', असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे. 

राजीनामा घेणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

नवाब मलिक (Nawab Malik) यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी तब्बल साडेसात तासांच्या चौकशीअंती अटक केली. विशेष न्यायालयाने ३ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक यांच्या पाठीशी महाविकास आघाडी भक्कमपणे उभी आहे. मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत घेतला जाणार नाही, असे महाविकास आघाडीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसनवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेसआमदारअंमलबजावणी संचालनालय