Coronavirus: “देशात कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याला भाजप जबाबदार असेल”; नवाब मलिकांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 03:12 PM2022-01-01T15:12:56+5:302022-01-01T15:13:59+5:30
Coronavirus: भाजपला उत्तर प्रदेशातील सत्ता जाताना दिसत असून, निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा देशभरात कोरोनाचे (Coronavirus) रुग्ण वाढताना पाहायला मिळत आहेत. त्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटची (Omicron Variant) लागण झालेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉन किंवा कोरोनाचा प्रसार शिघेला पोहोचू शकेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच देशाच्या निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणूक कार्यक्रम नियोजनाप्रमाणे घेण्यावर भर दिला आहे. या एकूणच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यातील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट आली, तर त्याला भाजपवाले जबाबदार असतील, अशी टीका नवाब मलिकांनी केली आहे.
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार देशातील बहुतांश राज्यांत झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे एकीकडे चिंता वाढली असून, दुसरीकडे उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार रंगात आला आहे. या प्रचारसभांना मोठी गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. यावरून नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याला भाजप जबाबदार असेल
मुंबई, महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत आहे. पंतप्रधान लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवायला, मास्क लावायला सांगत आहेत. पण भाजपवालेच त्यांचे ऐकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हजारोंच्या संख्येने लोक जमवत आहेत. त्यांच्या प्रचारसभा थांबत नाहीत. इतर राज्यांत निवडणुका असताना दुसरी लाट आली, त्याचप्रमाणे तिसरी लाट निर्माण करण्यात भाजपाच्या लोकांचा हात राहील हे स्पष्ट आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे.
भाजपला उत्तर प्रदेशात सत्ता जाताना दिसतेय
भाजपला उत्तर प्रदेशात सत्ता जाताना दिसत आहे. योगींचा चेहरा बाजूला करून त्यांना उत्तर प्रदेशात निवडणुका घ्यायच्या आहेत. त्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव भाजपा खेळू शकते. निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव करू नका. निवडणुका वेळेवर घ्या. राष्ट्रपती राजवट लावून राज्यांचे अधिकार आपल्या हातात घेण्याचा डाव पुढे आणू नका. निवडणूक घेत असताना पाच लोकांपेक्षा जास्त प्रचाराला हजर राहणार नाही, डोअर टू डोअर प्रचार करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अशा निवडणुका होऊ शकतात, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात २२ हजार ७७५ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून, ४०६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ओमायक्रॉनबाधितांचा आकडा आता १ हजार ४३१ इतका झाला आहे. देशात आताच्या घडीला १ लाख ४ हजार ७८१ अॅक्टिव केसेस असून रिकव्हरी रेट ९८.३२ टक्के इतका आहे.