Demonetisation: “नोटबंदीला ५ वर्षे झाली; मोदीजी, देशाच्या जनतेने तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी?”: नवाब मलिक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 04:08 PM2021-11-08T16:08:25+5:302021-11-08T16:09:47+5:30
Demonetisation वरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई: केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकारने ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटबंदीच्या निर्णयाला आता ५ वर्षे पूर्ण होत आहेत. यावरून पुन्हा एकदा विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. नोटबंदीमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. मोदीजी, आम्ही विचारत आहोत की तो कोणता चौक आहे आणि देशाच्या जनतेने तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी, अशी विचारणा नवाब मलिकांनी केली आहे.
नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना केंद्रातील मोदी सरकारवर नोटबंदीवरून टीकास्त्र सोडले. नोटबंदीमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. नोट बदलण्यासाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागले होते, अनेकांचा त्यात मृत्यू झाला आणि त्यानंतर मोदीजी म्हणाले होते की, मला तीन महिन्यांचा वेळ द्या. पण पाच वर्षे झाली ना काळा पैसा नष्ट झाला ना भ्रष्टाचार, ना दहशतवाद संपला, या शब्दांत नवाब मलिक यांनी नोटबंदीवर टीका केली.
देशाच्या जनतेने तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी?
नोटबंदीमुळे बेरोजगारी वाढली. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था हादरली. आज या निर्णयाला पाच वर्षे झाली. मोदीजी, तुम्ही त्यावेळी म्हणाला होता की, मला भर चौकात शिक्षा द्या. मोदीजी, आम्ही विचारत आहोत की तो कोणता चौक आहे आणि देशाच्या जनतेने तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी, अशी घणाघाती टीकाही मलिक यांनी केली.
दरम्यान, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर ५०० रूपयांच्या आणि १ हजार रूपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. आता या नोटबंदीला ५ वर्ष पूर्ण झाली आहे. असे असले तरी देशात हळहळू का होईना, रोख रकमेचे व्यवहारही वाढू लागले आहेत. पण याची एक सकारात्मक बाब म्हणजे डिजिटल पेमेंटदेखील पूर्वीच्या तुलनेत वाढले आहे. तसेच देश कॅशलेस इकॉनॉमीकडेही जात असल्याचे सांगितले जात आहे.