मुंबई: बॉलिवूड क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे खूप आभार मानले. मात्र, यानंतर एका मुलाखतीत बोलताना आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असे वादग्रस्त विधान केले. यावरून देशभरातून कंगनाविरोधात संतापाची लाट उसळली असून, संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी कंगना रणौतला तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करत कंगनाने केलेल्या वक्तव्यावर जोरदार निशाणा साधला. एक महिला जी चित्रपट अभिनेत्री आहे. केंद्र सरकारने तिला पद्मश्री पुरस्कार देण्याचे काम केले. तिच्या विधानाची आम्ही कठोर शब्दांत निंदा करतो. १८५७ पासून १९४७ पर्यंत या देशातून गोऱ्यांना बाहेर काढण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. जे लोक गोऱ्यांना पाठिंबा देत होते, त्यांच्या माध्यमातून पद्मश्री दिलेल्या लोकांना अशी विधाने करण्यासाठी पुढे केले जात आहे. त्यांनी लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. केंद्र सरकारने कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा आणि देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिला तत्काळ अटक करावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
सर्व क्रांतिकारकांनी काय भीक मागून स्वातंत्र्य मिळवले?
कंगनाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला असून, कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिला असे वक्तव्य करायची सवयच आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने देशाची माफी मागावी. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत. भाजपने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. फासावर गेलेल्या सर्व क्रांतिकारकांनी काय भीक मागून स्वातंत्र्य मिळवले? गेल्या ७५ वर्षात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी स्वातंत्र्यसैनिकांना भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तोच सन्मान कंगनाना देण्यात आला. हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा मला २ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते, सैन्य दलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीला प्रमोट करण्याचे काम करते, तेव्हा मला भाजपसोबत जोडले जाते. पण, हे मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात, ते तर देशाचे मुद्दे आहेत, असे कंगनाने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. कंगनाने या मुलाखतीदरम्यान आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असे कंगना म्हणाली.