Join us

फडणवीसांवर आरोप करण्याचे परिणाम भोगावे लागतील, भाजपचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 6:22 PM

देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादानं राज्यात ड्रग्जचा धंदा चालत असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला. त्यावर दिवाळीआधी मलिक यांनी लवंगी लावली आहे. दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन, असा सूचक इशारा फडणवीसांनी दिला

ठळक मुद्देमहाविकास आघाडीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून बेछुट आरोप सुरू केले आहेत. समीर वानखेडेंवर आरोप करताना त्यातून होणाऱ्या परिणामाची काळजी करावी.

नवी दिल्ली - क्रूझवरील ड्रग्स पार्टीवरून (Cruise Drug Party) एनसीबी विरुद्ध एनसीपी असा सुरू असलेला संघर्ष आता वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे. भाजपमधील नेत्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप करत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता (Amruta Fadnavis) यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर, फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलं. आता, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री नवाब मलिक यांना थेट इशारा दिला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादानं राज्यात ड्रग्जचा धंदा चालत असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला. त्यावर दिवाळीआधी मलिक यांनी लवंगी लावली आहे. दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन, असा सूचक इशारा फडणवीसांनी दिला. तसेच, मलिक यांचे सर्व आरोपही फडणवीसांनी फेटाळून लावले आहेत. आता, चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली असून, मंत्री नवाब मलिक यांना थेट इशाराचा दिला आहे.  

महाविकास आघाडीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून बेछुट आरोप सुरू केले आहेत. समीर वानखेडेंवर आरोप करताना त्यातून होणाऱ्या परिणामाची काळजी करावी. पण, यामध्ये भारतीय जनता पक्षाला ओढण्याचे, आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचे परिणाम खूप भोगावे लागतील, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. तसेच, पुराव्याशिवाय आपण जेव्हा बोलतो, तेव्हा पुरावे न सापडल्यास वाईट स्थिती होते, असेही ते म्हणाले.  

महत्त्वाचे म्हणजे, महाविकास आघाडी दरवेळी असा एक चेहरा उभा करते की, मूळ प्रश्नापासून, सामान्य माणसांच्या प्रश्नापासून लक्ष विचलीत करते. महाराष्ट्रात महापूर येऊन गेला, पीक वाहून गेलं, मराठवाड्यात जमीन वाहून गेली, शेतकऱ्यांना विक विमा मिळायचाय, मदत मिळायचीय, कोविडमधील पॅकेजसचा पत्ता नाही. तर, दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दररोज घडतायंत, 29 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या प्रश्नावर बोलण्यासाठी त्यांच्याकडे काही नाही, त्यामुळेच हे बेछुट आरोप करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. 

मलिक आणि फडणवीसांमध्ये जुंपली

देवेंद्र फडणवीस यांचे ड्र्ग्स माफियांशी संबंध आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रात ड्रग्सचा खेळ सुरू आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुरुवात नवाब मलिक यांनी केली आहे. आता शेवट मी करणार. त्यांनी लवंगी लावली, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे. नवाब मलिक यांचं अंडरवर्ल्डशी असलेलं कनेक्शन उघड करणार असून, त्याचे पुरावे शरद पवार यांनाही देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांनीही काढला चिमटा

दरम्यान, काही जण म्हणतात दिवाळीनंतर बॉम्ब फोडू. मी पाकिस्तानात बॉम्ब कधी फुटतील, याची वाट पाहतोय, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. राजकीय फटाक्यांसाठी दिवाळीची गरज नाही, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :चंद्रकांत पाटीलनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनवाब मलिकभाजपादेवेंद्र फडणवीस