Join us

“मी सगळ्या कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे”; नवाब मलिकांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 8:44 AM

समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सातत्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि या तपास यंत्रणेवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर वैयक्तिक पातळीवरही मोठे आरोप केले. यानंतर समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. हे प्रकरण न्यायालयात असून, यासंदर्भात मी सगळ्या कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे, असे प्रतिज्ञापत्र नवाब मलिक यांनी न्यायालयात सादर केल्याचे सांगितले जात आहे. 

सातत्याने केल्या जात असलेल्या टीकेनंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या दावा दाखल केला. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, नवाब मलिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. नवाब मलिकांनी प्रतिज्ञापत्र सादर करून त्यात सगळ्या कागदपत्रांची पडताळणी केल्याचे म्हटले आहे. 

मी सगळ्या कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे

नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर समीर वानखेडे यांच्या विवाहाबाबत काही कागदपत्रे शेअर केली होती. यानंतर न्यायालयाने याबाबत सतत्या पडताळून पाहिली होती का, अशी विचारणा केली. न्यायालयाने ज्ञानदेव वानखेडे आणि नवाब मलिक यांना अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. समीर वानखेडे यांच्याबाबत आम्ही सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहिली होती. समीर वानखेडे यांचा जन्म दाखला, जात प्रमाणपत्र आणि विवाहासंदर्भात नवाब मलिक यांनी काही कागदपत्रे जाहीर केली होती. नवाब मलिक अद्यापही आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, समीर वानखेडेंसोबत वाद असताना त्यांची बहीण, मेव्हणीवर आरोप करण्याचे कारण काय?, यासंदर्भात आम्ही कायदेशीर नोटीसही पाठवली आहे, असा दावा वानखेडेंनी न्यायालयात केला. त्यावर तुम्ही या घडीला केवळ होत असलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करा, तुमचा मुलगा एक सरकारी कर्मचारी आहे, तेव्हा सवाल उठणारच, असे न्यायालय म्हणाले. आपण समीर वानखेडेंचा जन्म दाखला, काही फोटो दाखवले, मात्र ते आधीच जाहीर झालेले आहे. आपण फक्त ती पुन्हा जारी केली, असा दावा नवाब मलिकांच्यावतीने करण्यात आला. मात्र, असे करताना त्याची सत्यता तुम्ही पडताळून पाहिली होती का? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. तसेच एक लोकप्रतिनिधी आणि एका राष्ट्रीय पक्षाचे नेते या नात्याने तुमचीही तितकीच जबाबदारी नाही का? असे न्यायालायने नवाब मलिकांना खडसावले. 

टॅग्स :नवाब मलिकसमीर वानखेडेमुंबई हायकोर्ट