Join us

नवाब मलिकांची अखेर १७ महिन्यांनंतर सुटका; समर्थकांची मोठी गर्दी, जल्लोषात केले स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 11:18 PM

नवाब मलिक यांची कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली.

मुंबई: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांची अखेर गेल्या १७ महिन्यांनंतर सुटका झाली आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळं सुप्रीम कोर्टानं त्यांना दोन महिन्यांसाठी तत्पुरता जामीन मंजूर केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांचं जोरदार स्वागत केलं. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. 

नवाब मलिक यांची कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर नवाब मलिक यांचं राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांकडून कुर्ल्यात जंगी स्वागत करण्यात आलं. तसेच त्यांच्या समर्थनासाठी बाईक रॅलीही काढण्यात आली. यावेळेस नवाब मलिक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत हस्तांदोलन करत त्यांचे आभार मानले.

याआधी मलिक यांनी कनिष्ठ न्यायालयात या संदर्भातील जामिनासाठी अर्ज केला होता. पण त्यावेळीही त्यांना जामीन नाकारण्यात आला होता. त्यानंतर जुलै महिन्यात उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. पण सर्वोच्च न्यायालयात ११ ऑगस्ट रोजी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय चाचणी दरम्यान त्यांची १ किडनी निकामी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या कारणास्तव त्यांना दोन महिन्यांचा अंतरिम मिळाल्याचे म्हटले जात आहे.

आधी काय घडले?

हायकोर्टाने अर्ज फेटाळत असताना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने दिलेला निर्णय योग्य ठरवला होता. नवाब मलिक यांनी कोर्टाकडून वैद्यकीय उपचारासाठी विशेष जामीन अर्ज केला होता. पण सध्या मलिक त्यांनी निवडलेल्या खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारात तपास यंत्रणांनी कुठेही आडकाठी केलेली नाही. त्यांच्यावरील उपचार व वैद्यकीय शस्त्रक्रियांसाठी त्यांना न्यायालयीन कोठडीत असताना कोणतीही मनाई केलेली नाही. त्यामुळे PMLA च्या आरोपातील आरोपीला जामीन देणं चूक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. त्यावर कोर्टाकडून मलिक यांचा कोठडीतील मुक्काम वाढवण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. पण आज अखेर त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला.

टॅग्स :नवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेसअंमलबजावणी संचालनालय