Join us

नवाब मलिक यांची अखेर सुटका; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 9:16 AM

मलिक बाहेर येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव गेल्या शुक्रवारी जामीन मंजूर केल्यानंतर सोमवारी सर्व न्यायिक प्रक्रिया पार पडल्यानंतर ते सायंकाळी बाहेर आले. मलिक यांच्या सुटकेच्या वेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, संजय तटकरे, नरेंद्र राणे उपस्थित होते. मलिक बाहेर येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मलिक यांना ईडीने अटक केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन मंजूर केला असला तरी त्यांच्या सुटकेसंदर्भातील कागदपत्रे सत्र न्यायालयात देऊन तिथून उचित औपचारिक आदेश प्राप्त करून घेणे गरजेचे होते. मात्र, सोमवारी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुटीवर असल्यामुळे मलिक यांच्या वकिलांनी विशेष न्यायमूर्ती ए. एम. पाटील यांच्यासमोर याचिका सादर केली. त्यानंतर त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. 

ही कागदपत्रे घेऊन मलिक यांचे वकील आर्थर रोड येथे गेले. मलिक गेल्या वर्षभरापासून क्रिटी केअर रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, त्यांचा ताबा आर्थर रोड प्रशासनाकडे आहे. आर्थर रोड प्रशासनाला ही कागदपत्रे सादर केल्यानंतर मलिक यांच्या रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या पोलिसांना हटवत त्यांची मुक्तता करण्यात आली.

५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन 

सुप्रिया सुळे मलिक यांच्यासोबत त्यांना सोडायला घरीदेखील गेल्या होत्या. मलिक यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर दोन महिन्यांसाठी जामीन देण्यात आला असून, त्यांना कोणत्याही विषयांवर माध्यमांशी बोलण्यास प्रतिबंध केला आहे.

 

टॅग्स :नवाब मलिक