मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी जमीन खरेदी करण्यासाठी हसीना पारकरला ५५ लाख नव्हे, तर ५ लाख रुपये दिल्याचं सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) पीएमएलए न्यायालयाला सांगितलं. आमच्याकडून टाईपिंग करताना चूक झाली. मात्र आता आम्हीच ती चूक न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत आहोत, असं ईडीचे वकील म्हणाले. मलिक यांची चौकशी करण्यासाठी त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
अंडरवर्ल्डशी असलेलं कथित कनेक्शन आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात मलिक यांना २३ फेब्रुवारीला अटक झाली. त्यानंतर न्यायालयानं मलिक यांना ८ दिवसांची कोठडी सुनावली. या प्रकरणी आज पीएमएलए न्यायालयात युक्तिवाद झाला. तेव्हा ईडीचे वकील अनिल सिंह यांनी ईडीकडून एक चूक झाल्याचं न्यायमूर्तींना सांगितलं. मलिक यांनी हसीना पारकरकडून जमीन खरेदी केली. त्यासाठी त्यांनी ५५ लाख रुपये मोजले, असा उल्लेख कागदपत्रांमध्ये झाला. मात्र प्रत्यक्षात हा आकडा ५ लाख रुपये आहे. टाईप करताना चुकून ५ चा आकडा दोनदा टाईप झाल्याचं सिंग म्हणाले.
ईडीच्या वकिलांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरून मलिक यांच्या वकिलांनी नाराजी व्यक्त केली. ईडीसारखी केंद्रीय तपास यंत्रणा अशा चुका कशा काय करू शकते, असा सवाल मलिक यांचे वकील अमित देसाई यांना उपस्थित केला. मलिक यांच्यावर राजकीय सूड उगवण्यासाठी जुनं प्रकरण मुद्दाम उकरून काढलं जात असल्याचा युक्तिवाद देसाई यांनी केला.
ईडीचे वकील अनिल सिंह यांनी मलिक यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. मलिक २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान उपचार घेत होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे आणखी ६ दिवस त्यांना कोठडी सुनावण्यात यावी. या कालावधीत त्यांची चौकशी करता येईल, अशी मागणी सिंह यांनी न्यायालयाकडे केली.