Nawab Malik नवाब मलिकांकडे इतके पुरावे आहेत मग कोर्टात का जात नाहीत?; NCB चा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 03:39 PM2021-11-07T15:39:31+5:302021-11-07T15:41:08+5:30
NCB अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या डिसुझा आणि वीवी सिंह यांच्यातील संभाषण नवाब मलिकांनी जारी केले. त्यात काहीही चुकीचं नाही
मुंबई – आर्यन खान(Aryan Khan) प्रकरणात मंत्री नवाब मलिक सातत्याने NCB च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. आता या प्रकरणात मलिकांनी आर्यन खानचं अपहरण करुन शाहरुख खानकडून वसुली करायची होती. आर्यनला त्याच्या मित्रांनी क्रुझवर नेले होते असा दावा केला. त्याचसोबत सॅम डिसुझा आणि NCB अधिकाऱ्याच्या संभाषणाची क्लीप मलिकांनी जारी केली. त्यावरुन आता NCB ने मलिकांवर पलटवार केला आहे.
नवाब मलिक(Nawab Malik) NCB अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत. जर मलिकांकडे इतके पुरावे असतील तर ते कोर्टात का जात नाही? असा सवाल NCB नं केला आहे. आर्यन खान अपहरण आणि वसुली प्रकरणात समीर वानखेडेंचा सहभाग होता असा आरोप मलिकांनी केला. क्रुझ पार्टीचं तिकीट आर्यननं खरेदी केले नव्हते. प्रतिक गाभा आणि अमिर फर्निचरवाला यांनी त्याला पार्टीला बोलावलं होतं असं मलिकांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलं.
सॅम डिसुझा वानखेडेंच्या संपर्कात नव्हता
NCB अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या डिसुझा आणि वीवी सिंह यांच्यातील संभाषण नवाब मलिकांनी जारी केले. त्यात काहीही चुकीचं नाही. अधिकारी डिसुझा यांना फोनवरुन काहीही डिलीट करू नको. तुझा आयएमईआय नंबर माझ्याकडे आहे असा इशारा देत होते. समीर वानखेडे सॅम डिसुझाच्या संपर्कात नव्हता असं त्यांनी सांगितले आहे.
मोहित भारतीय हे या प्रकरणाचे मास्टर माईंड आहेत. ६ तारखेला माझी पत्रकार परिषद झाली त्यानंतर ७ तारखेला समीर वानखेडे आणि मोहित भारतीय दोघंही ओशिवरा येथील कब्रस्तानजवळ भेटले होते. ते दोघंही नशिबवान आहेत की, या भेटीचे व्हिडीओ मिळाले नाहीत कारण पोलिसांचा सीसीटीव्ही काम करत नव्हता. अभिनेता शाहरुख खानला धमकवण्यात येत असून त्याने पुढे यायला हवं. अन्यायाविरोधात सुरु असलेल्या माझ्या लढाईत सहभागी व्हावं असं आवाहन मलिकांनी केले आहे.
काय म्हणाले नवाब मलिक?
कोणत्याही नेत्यावर आम्ही आरोप करत नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील ही लढाई नाही. तर एनसीबीत जी चांडाळ चौकडी बसली आहे त्यांना एक्सपोज करत आहोत. या चांडाळ चौकडीला बाहेर ठेवा, त्यांच्यामुळे NCB ची बदनामी होत आहे. यांची चौकशी करा. लॉजिकल एंडपर्यंत प्रकरण न्या अशी आमची वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे. तुमची बदनामी करू नका. देशाला नशामुक्त करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं आवाहन मलिकांनी केलं. ड्रग्जची साफसफाई झाली पाहिजे. पण ही चांडाळ चौकडी राहिली तर साफसफाई होणार नाही असंही ते म्हणाले.
तसेच या पार्टीला मंत्री अस्लम शेख यांना काशिफ खान का घेऊन जाणार होता? मंत्र्यांच्या मुलांना का ट्रॅप करत होता? कट रचून ड्रग्जचा खेळ सरकार चालवत आहे अशी बदनामी करण्याचा हा डाव होता, असा दावा करतानाच अस्लम शेखही हे सुद्धा या प्रकरणाची माहिती देतीलच. आता या प्रकरणाची मुंबईच्या एसआयटीनेही चौकशी केली पाहिजे, अशी मागणी मलिकांनी केली.