मुंबई - एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला पोहोचला आहे. मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा मुद्दा उपस्थित केला असून समीर वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे म्हटले होते. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मलिक यांचे आरोप फेटाळले आहेत. तर, क्रांती रेडकर यांनीही मलिक यांच्यावर निशाणा साधला. त्यावर मलिक यांनी पुन्हा समीर वानखेडेंना लक्ष्य केलंय.
मी जन्मापासून दलित आहे, माझे आजोबा-पणजोबा हिंदू होते, मीही हिंदूच कुटुंबात जन्मलो. मग, माझा मुलगा समीर मुस्लीम कसा होईल, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्टच सांगितले. तसेच, नवाब मलिक यांचा जावई तुरुंगात असल्यामुळेच त्यांचा हा खटाटोप सुरू आहे. त्यांच्याकडून आमच्यावर वैयक्तिक हल्ला चढवला जात आहे. त्यामुळे, आम्ही त्यांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करू, असेही वानखेडे यांनी म्हटलं आहे. त्यावर उत्तर देताना माझा जावई निष्पाप आणि गरीब असल्याच मलिक यांनी म्हटलं आहे.
माझ्या जावयाला निष्पाप अडकवतो, म्हणजे हा किती बदमाश व्यक्तीय. म्हणजे ह्या सगळ्या केसेस आम्ही 6 महिने तपास करत असताना, याच्या फेक केसेसे आम्हाला दिसत होत्या. आता, कोणीतरी विसल ब्लोअर झालंच पाहिजे, अन्यायाविरुद्ध बोललंच पाहिजे, माझ्या जावयाला यांनी अडकवलेलंय असं मी कधीच बोललो नाही. पण, कोर्टाच्या आदेशानंतर ते निष्पाप आहेत, हे स्पष्ट होतं. त्यामुळे मी बोलायला सुरूवात केली. आता, माझ्या जावयाला अडवतंय, म्हणजे गरीब माणसाला किती अडकवताय, असे म्हणत मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला.
यासंदर्भात अभ्यास करत असताना, ह्या व्यक्तीने बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी घेतली, याचे पुरावे आम्ही गोळा केले. त्यातूनच, एका भाषणात मी, हा माणूस तुरुंगात जाईल, असे सांगितले होते. मी कधीही कोणाच्या धर्माबाबत बोलत नाही, पण या व्यक्तीने एका मागास व्यक्तीचा हिस्सा हिरावून घेतला, हाच माझा लढा असल्याचे मलिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटले आहे.
काय म्हणाल्या क्रांती रेडकर
मलिक यांनी केलेल्या आरोपावर समीर वानखेडे यांचं कुटुंब चांगलेच भडकले आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर(Kranti Redkar) म्हणाल्या की, जात प्रमाणपत्रानुसार समीर वानखेडे हिंदू आहेत ते नाकारलं जाऊ शकत नाही. नवाब मलिक यांनी कोर्टात जावं. मंत्री नवाब मलिक खूप खालच्या पातळीवर गेलेत आहेत. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. आरोप करताना लाज वाटली पाहिजे. हिंदू महार असल्याचं प्रमाणपत्र सासऱ्यांनी सगळ्यांना दाखवलं आहे. नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते कोर्टात सिद्ध करावं. जितक्या खालच्या दर्जाला जात आहे त्याने असंच वाटतं मंत्रिपदाची काही देणंघेणं नाही असं तिने म्हटलं आहे.