मलिकांवर खासगी रुग्णालयात उपचार, देशमुखांवर मात्र जे. जे.मध्ये शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 09:19 AM2022-05-14T09:19:48+5:302022-05-14T09:20:01+5:30

खासगी रुग्णालयात उपचार करण्याचा अनिल देशमुखांचा अर्ज फेटाळला

Nawab Malik is being treated at a private hospital, while Surgery on Anil Deshmukh in J. j hospital | मलिकांवर खासगी रुग्णालयात उपचार, देशमुखांवर मात्र जे. जे.मध्ये शस्त्रक्रिया

मलिकांवर खासगी रुग्णालयात उपचार, देशमुखांवर मात्र जे. जे.मध्ये शस्त्रक्रिया

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  विशेष पीएमएलए न्यायालयाने अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा तात्पुरता वैद्यकीय जामीन अर्ज मंजूर करण्यास नकार दिला. मात्र, त्यांना कुर्ला येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली.

जे. जे. रुग्णालय नवाब मलिकांना वेगवेगळ्या चाचण्या करण्यासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या  रुग्णालयात पाठवत आहे. कदाचित सरकारी रुग्णालयात संबंधित विभाग नसावा किंवा आवश्यक त्या चाचण्या करण्यासाठी त्यांच्याकडे साधने नसावीत, अशी माहिती नवाब मलिकांच्या वकिलांनी विशेष न्यायालयाचे न्या. राहुल रोकडे यांना दिली.
 न्यायालयाने याबाबत तपास यंत्रणेकडून उत्तर मागितल्यावर ईडीने सांगितले की, मलिक यांना तपासणीसाठी खासगी रुग्णालयात नेण्यास आमची हरकत नाही. त्यानंतर न्यायालयाने मलिक यांना कुर्ला येथील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी दिली. तसेच यादरम्यान मलिक यांच्या मुलीला त्यांच्याबरोबर राहण्याची परवानगी दिली. 

६३ वर्षीय मलिक यांनी २८ एप्रिल रोजी वैद्यकीय जामीन न्यायालयात दाखल केला. उपचारासाठी सहा आठवड्यांचा तात्पुरता जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती मलिक यांनी न्यायालयाला केली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व त्याच्या काही जवळच्या साथीदारांविरुद्ध १४ फेब्रुवारी रोजी नोंदविलेल्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली. एनआयएने याप्रकरणी ३ फेब्रुवारी २०२२ रोजी  नोंदविलेल्या गुन्ह्यावर आधारित ईडीने हा गुन्हा नोंदविला.

स्वखर्चाने उपचार घेण्याबाबत आक्षेप  
खासगी रुग्णालयात निखळलेल्या खांद्यावर शस्त्रक्रिया व उपचार करण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी देशमुख यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांनी स्वखर्चाने उपचार घेण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, ईडीने त्यांच्या अर्जावर आक्षेप घेतला. देशमुख यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी जे. जे. रुग्णालय सुसज्ज आहे. चांगले डॉक्टरही या रुग्णालयात आहेत, असे ईडीने न्यायालयाला सांगितले.

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ईडीने देशमुख यांना अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. 
पदाचा गैरवापर करत देशमुख यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत सीबीआयने गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर ईडीने देशमुख यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे. 

खासगी रुग्णालयात खांद्यावर शस्त्रक्रिया करण्याची परवानगी मागण्यासंदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला.  जे. जे. सरकारी रुग्णालयात ते शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ती वैद्यकीय प्रक्रिया पार पाडू शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
 

Web Title: Nawab Malik is being treated at a private hospital, while Surgery on Anil Deshmukh in J. j hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.