नवाब मलिकांचे दुबई, दाऊद आणि ड्रग्ज कनेक्शन असण्याची शक्यता; ज्ञानदेव वानखेडे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 06:00 PM2021-10-31T18:00:19+5:302021-10-31T18:06:37+5:30
Nawab Malik Link with Dubai, dawood and Drugs : १०० रुपयांचा नटबोल्ट विकणारा माणूस करोडोची संपत्ती कशी गोळा करू शकतो? याची माहिती आणि चौकशी सरकारने करावी.
मुंबई ड्रग्स केस प्रकरणावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांची जात आणि धर्मावरून तसेच त्यांच्या वडिलांच्या नावावरून गंभीर आरोप करण्यात येत होते. त्या आरोपांना आज समीर वानखेडेंच्या वडिलांनी त्यांच्याकडील सर्व प्रकारची कागदपत्रे मीडियाला दाखवून प्रत्युत्तर दिले आहे. तसेच मंत्री नवाब मलिक यांच्यावरच गंभीर प्रत्यारोप केले आहे. एक भंगारवाला करोडोचा मालक कसा? त्यांचे दुबई आणि ड्रग्ज कनेक्शन असू शकते, त्याची चौकशी करा असा घणाघाती आरोप ज्ञानदेव वानखेडे यांनी केले आहे.
तसेच पुढे ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांनी मंत्रिपद ग्रहण करताना संविधानाची शपथ घेताना कोणत्या आकसापोटी, कोणाची व्यक्तिगत जात आणि धर्मावरून आरोप करणार नाही असं असून ते माझ्या कुटुंबाची बदनामी करत आहेत. मी कधीही मुस्लिम झालो नाही. तसेच मीडियाच्या माध्यमातून त्यांनी विनंती केली की, मलिक मुंबईत कधी आला, त्यांचं गाव कुठलं, तो जन्माला कुठं ? पहिलं नाव काय? एका भंगारवाल्याचं नाव नवाब कसं? याची माहिती काढावी. १०० रुपयांचा नटबोल्ट विकणारा माणूस करोडोची संपत्ती कशी गोळा करू शकतो? याची माहिती आणि चौकशी सरकारने करावी.
नवाब मलिक यांनी आपल्या मुलीकडे आणि जावयाकडे लक्ष देऊन चांगले संस्कार द्यावेत. मलिकांना काय बोलायचं असेल तर कोर्टात जावं. ड्रग्जमध्ये मलिकांचा हात असू शकतो. कारण १०० रुपये कमवणारा भंगारवाला ड्रग्जमधून करोडो पैसे कमावू शकतो. त्यांची मुलगी आणि जावई ड्रगिस्ट आहे. दुबई ड्रग्ज सिंडिकेटचा मलिक हिस्सा असू शकतात. त्यांचं दुबई, दाऊद आणि ड्रग्ज कनेक्शन असू शकतं. कारण त्यांचा जावई ड्रग्ज प्रकरणात पकडला होता. वांद्र्यातील वास्तू हे घर कसं आलं यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, असे अनेक आरोप समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केले आहेत.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना समीर वानखेडे यांच्या वडिलांनी त्यांची जात आणि धर्म, नाव दर्शवणारे सर्व पुरावे समोर ठेवले. यामध्ये आधार कार्ड, मतदार यादीतील नावापासून, शाळेतील दाखले, नोकरीमधील कागदपत्रे आणि जमिनीची कागदपत्रे सादर केली. ते म्हणाले की, आम्ही एका दलिताचा हक्क हिरावल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र आम्ही दलितच आहोत. मंडळी ही माझी कागदपत्रे आहेत त्यामध्ये जन्मल्यापासून, शाळा-कॉलेजमधील दाखले यांचा समावेश आहे. मी शेड्युल कास्ट महार जातीचा असून, मी कधीही धर्मांतर केलेलं नाही. मी नोकरीला लागल्यापासून निवृत्त होईपर्यंत कधीही धर्म बदललेला नाही. पण मी एका मुस्लिम महिलेशी लग्न केलं हे सत्य आहे. १९७८ मध्ये आम्ही हिंदू पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर समीरने किंवा मी कधीही इस्लामिक धर्मांतर केलेलं नाही. आज मी माझ्या दीडशे वर्षांतील वंशावळीचे पुरावे तुमच्यासमोर सादर करत आहे. मी मागासवर्गीय, आंबेडकरवादी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. आज मंत्री रामदास आठवले येथे असल्याने माझ्या जातीचे लोक माझ्यामागे आहेत, याचा मला आनंद आहे, असे ते म्हणाले.