मुंबई - राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात नेले आहे. तिथे सकाळपासून त्यांची चौकशी करण्यात आली. भल्या पहाटे ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर, विरोधकांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अभिनेत्री क्रांती रेडकरनेही ट्विट करुन मलिक यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
मलिक यांना ईडीने सकाळी ताब्यात घेतल्यानंतर चौकशीअंती त्यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर, सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात नवाब मलिक यांना हजर केले असून सुनावणी सुरू झाली. मलिक यांना १४ दिवसांच्या कोठडीची मागणी ईडीने कोर्टाकडे केली आहे. तसेच, नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी कोर्टात सांगितले की, मला समन्स न देता बोलावले आहे आणि ईडीने मला घरीच ताब्यात घेतले.
मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले असून सोशल मीडियासह मुंबईतील कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होत आहे. विरोधकांनी या अटकेचं समर्थन केलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार नाही, त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे समीर वानखेडे प्रकरणात मलिक यांनी सातत्याने वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. त्यावेळी, समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनीही मीडियासमोर येऊन मलिक यांच्यावर टीका केली होती. आज, मलिक यांना ईडीने ताब्यात घेतल्याचे वृत्त माध्यमांत झळकल्यानंतर क्रांती रेडकर यांनी ट्विट करुन अप्रत्यक्षपणे मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.
सन-न-न-आंधिया उठे, शत्रू जड से मिठेहमने बात यही मन में ठानी है माय ऐ भवानी
क्रांती यांनी तान्हाजी चित्रपटातील अजय देवगण आणि काजोल यांच्या गाण्यातील 28 सेकंदाचा व्हिडिओ ट्विट केला. तसेच, वन ऑफ माय फेव्हरेट साँग, जय माय भवानी... आप सब का दिन शुभ हो... असे ट्वि केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांनी 20 फेब्रुवारी रोजी त्यांच्या अकाऊंटवरुन ट्विट केलं होतं. क्रांती यांच्या या ट्विटवर अनेकांनी ईडीच्या कारवाईशी संबंधित कमेंट केल्या आहेत. एकाने सत्यमेव जयते.. असेही म्हले आहे.
दरम्यान, मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे जे रुग्णालयात नेले होते. ईडी कार्यालयाबाहेर तणाव वाढला आहे असून एनसीपीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.