मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) ईडीच्या कोठडीत आहेत. मनी लॉंड्रिंग प्रकरणी काही दिवसांपूर्वी नवाब मलिकांना ईडीने अटक केली होती. ईडीची कारवाई चुकीची असल्याचे सांगत नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना अंतरीम जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, मलिक यांचा कोठतील मुक्काम आणखी वाढला आहे. त्यामुळे, मलिक यांच्या कन्येनं एक व्हिडिओ शेअर करत, अधिवेशनापूर्वीच त्यांना अटक केल्याचं म्हटलंय.
नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि नवाब मलिक यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, एका कार्यक्रमात नवाब मलिक हे फडणवीस आणि केंद्र सरकारवर बोलत आहेत. त्यातच, विरोधी पक्षनेता दोन पाऊले मागे सरकला. काहीतरी असल्याशिवाय ते मागे सरकणार नाहीत. आता एनसीबी झालंय, यापुढे ईडीची बारी असून ईडीचाही भांडाफोड आपण करणार असल्याचं मलिक या व्हिडिओत म्हणत आहेत. 2 डिसेंबर रोजी मलिक यांनी हे भाषण केले होते.
त्यामध्ये, हायड्रोजन बॉम्ब अजून फुटलेला नाही, तो ठेवलेलाच आहे मी. मी विधानसभेत तो बॉम्ब फोडणार आहे, असे मलिक यांनी म्हटले होते. 2 डिसेंबर रोजी मलिक यांनी हा इशारा दिला होता. तसेच, भाजपच्या कुठल्या नेत्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे, त्याची माहिती माझ्याकडे आहे. ती सीडी मी काढली तर काय होईल हे ह्यांना माहित नाही. ही सीडी बाहेर काढल्यानंतर ते लोकांसमोर तोंडही दाखवू शकत नाहीत, असे प्रकरणं आमच्याकडे आहेत, असेही मलिक यांनी म्हटले होते. मात्र, विधानसभा अधिवेशनापूर्वीच 23 फेब्रुवारी 2022 रोजी मलिक यांना ईडीने अटक केली. त्यानंतर, काही दिवसांतच विधानसभेच्या अधिवेशनाला सुरूवात झाली, असेही या व्हिडिओत म्हटले आहे.
मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच, सत्य हे सूर्यासारखं असतं, ते जास्त काळ लपत नाही. माझे वडिल हे सत्य सांगणार होते, म्हणून त्यांना अडकविण्यात आले, असे म्हटले आहे.