मुंबई - भाजपमधील नेत्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप करत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता (Amruta Fadnavis) यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर, फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलं. तर, भाजप नेतेही संतापले असून मंत्री मलिक यांच्यावर निशाणा साधत आहेत. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनीही नवाब मलिकांवर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.
फडणवीस यांच्या कुटुंबीयांवर टीका केल्यानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलंय. तर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याचे परिणाम भोगावे लागतील, असे म्हणत थेट इशाराच दिला. त्यानंतर, आता आमदार श्वेता महाले यांनी मलिक यांच्यावर आरोप करताना चोराच्या उलट्या बोंबा, असे म्हटले आहे.
श्वेता यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले की, नवाब मलिकजी, आरोप करताना कुणावर करतोय एवढे तरी भान ठेवाव…! आज वसुबारस, यानिमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटते,"कावळ्याच्या शापाने गाई गुर मरत नसतात", असे ट्विट श्वेता महाले यांनी केले होते. तर, दुसऱ्या ट्विटमध्ये बोचरी टीका केली आहे. महाराष्टाचे सर्वात यशस्वी मुख्यमंत्र्यांपैकी एक असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांच्या सारख्याने केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. जावई बापू ड्रग्ज प्रकरणात अटकेत असल्याने नवाब मियाँ ना ड्रग्जची कावीळ झाली आहे. मेंदू व तब्येत तपासून घ्या, असा सल्लाच महाले यांनी दिला आहे.
भाजपकडून नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल
क्रूझवरील ड्रग्स पार्टीवरून (Cruise Drug Party) एनसीबी विरुद्ध एनसीपी असा सुरू असलेला संघर्ष आता वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री नवाब मलिक यांना थेट इशारा दिला आहे. तर, केशव उपाध्ये यांनी मलिक यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लक्ष देण्याचं सूचवलं आहे.