Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे, एकदिवस तुम्हाला बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 02:17 PM2022-03-09T14:17:56+5:302022-03-09T14:26:42+5:30
मुंबईच्या मारेकऱ्यांसोबत आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला लाज का वाटली नाही? असा संतप्त सवाल फडणवीसांनी विचारला.
मुंबई – नवाब मलिक(Nawab Malik) आणि दहशतवाद्यांचा जो जमीन व्यवहार झाला त्यामागे सूत्रधार दाऊदची बहीण हसीना पारकर ही होती. या पैशाचा वापर मुंबईत ३ बॉम्बस्फोट घडवण्यासाठी झाला. काळ्या पैशातून जमीन खरेदी करून टेरर फंडिंग केले गेले. या टेरर फंडिंगमध्ये महाराष्ट्रातलं मंत्री मदत करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्हाला एकदिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यावं लागेल. कुणाच्या दाढ्या कुरवाळताय? तुम्ही मलिकांचा राजीनामा घेतला नाही, तरी आमचा संघर्ष सुरूच राहील असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, हा संघर्ष साधा नाही. तर देशभक्तांचा संघर्ष आहे. देशद्रोह्याच्या विरोधात संघर्ष आहे. पाकिस्तान धार्जिण्या लोकांविरोधात संघर्ष आहे. ज्या भारतमातेसाठी अनेकांनी बलिदान दिलं त्यांच्यासाठी हा संघर्ष आहे. दहशतवाद्यांसोबत आर्थिक व्यवहार असलेल्या आरोपामुळे जेलमध्ये गेलेल्या मंत्री नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोवर शांत बसू शकत नाही. ही मागणी केवळ राजकारणासाठी नाही. आम्ही रोज राजीनामे मागत नाही. मात्र ही घटना पाहिली तर मुंबईकरांच्या मारेकऱ्यांसोबत ज्यांनी आर्थिक व्यवहार केले त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. २५ रुपये चौरस फुटानं एलबीएस मार्गावरील जागा नवाब मलिकांनी विकत घेतली. उकिरड्याची जागाही मुंबईत एवढ्या कमी किंमतीला मिळणार नाही. विक्री पत्र दाखवलं तर त्यावर हरामखोर दहशतवाद्यांचे फोटो आणि नवाब मलिकांच्या मुलाचा फोटो आहे. मुंबईच्या मारेकऱ्यांसोबत आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला लाज का वाटली नाही? दहशतवादी हल्ल्यात जी मुंबईत जखमी झाली ती व्यवहार करताना तुम्हाला दिसली नाही का? बनावट कागदपत्रे तयार करून हा सगळ्या व्यवहार केला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच तुम्ही आमच्याविरोधात षडयंत्र करत आहात. पण आम्ही घाबरणार नाही. एका नरेंद्र मोदीला संपवण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र आला. परंतु जनतेचा आशीर्वाद असल्यानं ते जागतिक नेते झाले. आम्ही मोदींचे सैनिक आहोत. त्यांचा आशीर्वाद आमच्यामागे आहे. आमचे संबंध गुन्हेगारांशी नाही. आमच्याविरोधात कितीही षडयंत्र केले तर शिवरायांच्या आशीर्वादाने ते हाणून पाडू. आमच्याकडे अनेक बॉम्ब आहेत. योग्यवेळी तो फोडला जाईल. संघर्ष सुरू झाला आहे. पोलिसांशी संघर्ष करू नका. आपला संघर्ष पोलिसांशी नाही. अटक केली तरी अटक व्हा. जोपर्यंत नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोवर आम्ही थकणार नाही, झुकणार नाही आणि विकणारही नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
LIVE Speaking at @BJP4Mumbai’s massive protest #NawabHataoDeshBachao at Azad Maidan, Mumbai !#Mumbai#Maharashtra#AzadMaidanhttps://t.co/ZU4diU8EJt
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 9, 2022
दाऊदच्या दबावामुळे राजीनामा मागे घेतला – चंद्रकांत पाटील
दाऊदच्या दहशतवाद्यांशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे. या सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. वीज कापली जातेय. विद्यार्थ्यांचे नुकसान होतंय. पण या सरकारला दाऊदच्या मंत्र्यांना वाचवायचं आहे. दाऊदच्या दबावामुळे नवाब मलिकांचा राजीनामा मागे घेतला गेला असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.