मुंबई : आमदार नवाब मलिकअजित पवार गटाच्या बैठकीत सहभागी झाल्याने भाजपच्या गोटातून त्याबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. विधान परिषद निवडणूक असल्याने याबाबत सध्या तरी भाजपने उघडपणे भूमिका घेतलेली नाही. मात्र, विधान परिषद निवडणुकीत नवाब मलिक यांची गरज असली तरी सक्रिय राजकारणात मलिक यांना बरोबर घेऊ नये, असे विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी म्हटले आहे.
विधान परिषद निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचे असल्याने अजित पवारांची सध्या मजबुरी आहे. नवाब मलिक या निवडणुकीत मतदार आहेत, त्यामुळे ते अजित पवारांच्या बैठकीला आले असतील; पण भाजपसोबत नवाब मलिक सक्रिय राजकारणात असणे, हे या देशातील आणि प्रांतातील कोणीही नागरिक सहन करत नाही, याबाबत अजित पवारांनी दक्षता घ्यावी, असे शेंडे म्हणाले.
मतदारसंघातील कामांसाठी भेट - मुश्रीफ
नवाब मलिक कोणत्याही संघटनेशी जोडले गेलेले नाहीत. ते आपल्या मतदारसंघातील, तसेच विधानसभेच्या कामासाठी अजित पवारांना भेटत असतील, त्यामुळे गैरसमज करण्याची आवश्यकता नाही, असे अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे, तर नवाब मलिक आमच्यासाठी अडचणीचे ठरण्यापेक्षा अजित पवार त्याबाबत काय भूमिका घेतात ते महत्त्वाचे असल्याचे शिंदे सेनेचे म्हणणे आहे.
नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर झालेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मलिक सत्ताधारी बाकावर बसले होते. त्यावेळी फडणवीसांनी याबाबत अजित पवारांना पत्र लिहून जाहीर नाराजी व्यक्त केली होती; पण अजित पवारांनी त्याला कोणतेही उत्तर दिले नव्हते.