मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयानं अटक केली आहे. ईडीनं पहाटे मलिक यांना घरातून ताब्यात घेतलं. आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीनं त्यांना अटक केली. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या, विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. शिवसेनेकडून संजय राऊत हे भूमिका मांडताना दिसतात. आता, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीही ट्विटरवरुन आपली भूमिका मांडली आहे.
नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधला. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर, वळसे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही त्यांच्यासोबत होते. एकूणच ईडीच्या या कारवाईनंतर महाविकास आघाडीचे नेते एकत्र येताना दिसत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करुन भाजपवर निशाणा साधला. पण, आपल्या ट्विटमध्ये त्यांनी कुठेही मंत्री नवाब मलिक यांच्या नावाचा उल्लेख केला नाही.
मोदी सरकारकडून केल्या जात असलेल्या केंद्र सरकारी यंत्रणांच्या राजकीय वापराला आमचा तीव्र विरोध आहे, असे ट्विट पटोले यांनी केले आहे. पटोले यांच्या ट्विटवर अनेकांनी कमेंट करुन त्यांनाच लक्ष्य केलं आहे. केवळ ट्विटरवर तीव्र निषेध करुन काही होणार नाही, असे एकाने म्हटले आहे. तर, अतिशय कडक शब्दात निषेध केला, असा खोचक टोलाही एका ट्विटर युजर्संने लगावला आहे.
यशोमती ठाकूर याचं ईडीला चॅलेंज
काँग्रेस नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडी मजबूत असल्याचे सांगता ईडीला थेट शिवाजी पार्कवर बोलावलं आहे. 'ईडीला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर, या शिवाजी पार्कात ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही १७० जणं एकत्र भेटू. आणि एक सांगते, कदाचित तुमचं काम संपेपर्यंत १७० चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो. MVA ची एकजूट तुटणार नाही, उलट मजबूत होतेय, असे ट्विट यशोमती ठाकूर यांनी केलंय.