Nawab Malik Latest News: भाजपने टेरर फंडिंग आणि मनी लॉड्रिंगचे आरोप केलेल्या नवाब मलिकांना अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिलीये. मलिक निवडणूक लढवत असलेल्या शिवाजीनगर मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार दिला आहे. भाजपने नवाब मलिकांना पराभूत करण्यासाठी काम करणार असल्याची भूमिका घेतली आहे. भाजपकडून कडाडून विरोध होत असताना आता नवाब मलिकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
एका मुलाखतीत बोलताना नवाब मलिक म्हणाले, "मी महायुतीचा उमेदवार आहे, असं तर तुम्ही बोलू शकत नाही. कारण शिवसेनेचा उमेदवार तिथे आहे. भाजपचे कार्यकर्ते माझं काम करणार नाही, असं उघडपणे भाजपचे नेते सांगताहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे. माझ्यासोबत महायुतीचे दुसरे उमेदवार उभे आहेत."
"माझ्यावर जे आरोप करताहेत, तो न्याय प्रविष्ट आहे. त्यावर मला बोलण्याची परवानगी नाहीये. पण, जेव्हा निकाल येईल, तेव्हा सत्य काय लोकांच्या समोर येणार आहे. मी आजपर्यंत कोणतीही खोटी कामं केली नाही. कोर्टाचा निकाल येईल, तेव्हा याला उत्तर मिळेल", असं उत्तर नवाब मलिक यांनी भाजपच्या आरोपांवर दिले.
"मला उमेदवारी देऊ नये म्हणून, उघडपणे सांगत होते. हे आम्हाला चालणार नाही. तरी त्यांचा विरोध बाजूला ठेवून दादांनी (अजित पवार) उमेदवारी दिली. मी त्यांचा आभारी आहे", असा दावा नवाब मलिकांनी केला.
"या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं मी ठरवलंच नव्हतं. पण, चार-पाच महिन्यांपासून जनता मला आग्रह करत होती. त्यांचे सगळे प्रश्न आहेत... विशेषतः ड्रग्जचा प्रश्न आहे", असे नवाब मलिक म्हणाले.