Nawab Malik vs Sameer Wankhede: मुंबईतील ड्रग्ज क्रूझ पार्टी प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात सुरू केलेली आरोपांची मालिका अजूनही कायम आहे. नवाब मलिक यांनी आज आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी निगडीत आणि सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या केपी गोसावी याचे व्हॉट्सअॅप चॅट्स उघड केले आहेत. नवाब मलिकांच्या या नव्या खळबळजनक गौप्यस्फोटानं या प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईतील समुद्रात आयोजित क्रूझ पार्टीवर कारवाई करण्यासंदर्भातील काही चॅट्स आणि ऑडिओ क्लिप नवाब मलिक यांनी उघड केले आहेत. यातील एका ऑडिओ क्लिपमध्ये केपी गोसावी हा समीर वानखेडे यांच्या नावाचाही उल्लेख करत असल्याचं समोर आलं आहे. क्रूझवरील पार्टीत ठराविक व्यक्तींनाच टार्गेट करण्यासंदर्भात केपी गोसावी एका व्यक्तीसोबत चॅट्सवर बोलत असल्याचं दिसून येत आहे. "केपी गोसावी आणि माहिती देणारा व्यक्ती कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीत ठराविक लोकांना अडकवण्यासाठीचं प्लानिंग करत असल्याचं या व्हॉट्सअॅप चॅटमधून उघड होत आहे. ही समीर दाऊद वानखेडे यांची प्रायव्हेट आर्मी आहे आणि याची उत्तरं त्यांना द्यावीच लागतील", असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे.
कॉर्डिलिया क्रूझवर उपस्थित एक व्यक्ती सर्व माहिती केपी गोसावी याला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देत असल्याचं या चॅट्समधून समोर येत आहे. यात केपी गोसावी क्रूझवर उपस्थित असलेल्यांचे फोटो आणि त्यांची माहितीची विचारणा करत आहे. तसंच आपल्यासोबत एनसीबीचे ३५ अधिकारी आहेत आणि त्यांना अचूक माहिती हवी असल्याचंही तो म्हणत आहे. केपी गोसावी वारंवार संबंधित व्यक्तीकडे फोटो पाठवण्याची मागणी करत आहे. जेणेकरुन कारवाई करणं सोपं होईल.
दरम्यान, केपी गोसावी यानं समीर वानखेडे यांना ओळखत नसल्याचा दावा केला होता. तसंच त्याच्यावर करण्यात आलेले खंडणीचे आरोप देखील त्यानं फेटाळून लावले होते. पण आता या व्हॉट्सअॅप चॅट्समुळे प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. अर्थात नवाब मलिकांनी ट्विट केलेल्या चॅट्सची सत्यता पडताळून पाहण्यात आलेली नाही. पण त्यांच्या दाव्यानं आता या प्रकरणात खळबळ उडाली आहे.