मुंबई – मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर लावलेल्या आरोपावर भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. देश, मुंबई आणि महाराष्ट्राला गंभीर गुन्हेगारीपासून वाचवण्यासाठी भाजपाची लढाई आहे. १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्र्यांची चौकशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करावी. खुद्द मंत्र्यांनी व्यवहार झाल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आता चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी भाजपा नेते आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी केली.
पत्रकार परिषदेत आशिष शेलार म्हणाले की, १९९३ पासून २०२१ पर्यंत बॉम्ब स्फोटाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या शहा वली खानसोबत व्यवहार कसे झाले? विशेष परवानगी घेऊन तुम्ही २००५ मध्ये जेलमध्ये जाऊन हस्ताक्षर केले का? यात काळा पैशाचा व्यवहार झालाय का? किमान याचं उत्तर द्या. गुन्हेगाराशी हातमिळवणी करुन व्यवहार करण्यामागे मास्टर माईंड कोण होतं? ती मालमत्ता टाडाची गुन्हेगार म्हणून सरकारकडे जप्त व्हायला हवी होती. ती मालमत्ता तुमच्याकडे कशी आली? याचं उत्तर नवाब मलिकांना द्यावं लागेल असं शेलारांनी म्हटलं आहे.
तसेच लोकांची दिशाभूल करण्याचं काम नवाब मलिक करतत आहेत. हा व्यवहार करण्यामागे तुमची कल्पना होती की दाऊदची होती? राजकारणाचं गुन्हेगारीकरण संपवण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. परंतु आज पुन्हा दाऊदचं भूत मुंबईत शहरात उभं राहतंय. शिवसेनेनं आमच्या पाठित खंजीर खुपसून दुसऱ्यासोबत सत्ता स्थापन केली. हिंदुत्व सोडलं असेल तरी देशाच्या हितासाठी शिवसेनेच्या भावना चांगल्या आहेत ही आमची धारणा आहे. त्यामुळे तुमच्या मंत्रिमंडळातील सदस्य १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत व्यवहार करतो. त्याने कबुली दिली आहे. त्याबद्दल चौकशी करणार आहात का? असा सवाल आशिष शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला.
“इमरान शेख हा NCP कार्यकर्ता”
नवाब मलिकांनी हायट्रोजन बॉम्बची बात केली त्यांनी लवंगी फटाकाही उडवला नाही. मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफत शेख, समीर वानखेडे, रियाज भाटी हे सगळे आरोप करुन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी राहिला. या सर्व प्रकरणांशी देवेंद्र फडणवीसांचा काही संबंध आहे का याचे पुरावेही देऊ शकला नाहीत. हाजी हैदर, हाजी अराफत, मुन्ना यादव हे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच त्यांना पद देण्यात आले होते. आंदोलन वगळता कुठलाही गंभीर गुन्हा न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पदं देण्यात आले.
इमरान आलम शेखबाबत बनावट नोटांप्रकरणी अटक केली तो मुंबई काँग्रेसचा सेक्रेटरी असताना त्याला अटक केली होती. आज नवाब मलिक आरोप करत असताना इमरान शेख हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून फिरत आहे. DRI ने त्याला अटक केली परंतु त्यावेळी काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी इमरान शेखला संरक्षण देण्याचं काम करत आहे. तसेच नवाब मलिक षडयंत्राद्वारे अल्पसंख्याक समुदायाला बदनाम करण्याचं काम ते करत आहेत. शाहरुख, आर्यन, अस्लम शेख यांना अडचणीत आणण्याचं काम नवाब मलिकांनी केले. अल्पसंख्याक समाजाला बदनाम करण्याचं काम मलिक आणि राष्ट्रवादी करत आहेत असं शेलारांनी म्हटलं आहे.