Nawab Malik : 'मुन्ना यादव अन् हैदर आझमला फडणवीसांनी सरकारी खात्याचं अध्यक्षपद का दिलं?'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 10:47 AM2021-11-10T10:47:54+5:302021-11-10T10:51:07+5:30
मुंबईत झालेल्या 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांसह दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्यांकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक व कुटुंबीयांनी कवडीमोल भावात कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी मंगळवारी केला
मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून भाजप व राष्ट्रवादी यांच्यात आरोपांचे बॉम्ब फुटत आहेत. नवाब मलिक (Nawab Malik ) यांच्या कुटुंबीयांनी बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांकडून कोट्यवधी रुपयांची जमीन विकत घेतल्याचा बॉम्बगोळा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फोडला. तर फडणवीस यांच्या अंडरवर्ल्ड संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब आपण बुधवारी फोडू, असे प्रतिआव्हान मलिक यांनी दिले होते. त्यानुसार, मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांचे हैदर आझम आणि मुन्ना यादवशी काय संबंध आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, नोटबंदीच्या काळात 14 कोटी 56 लाख रुपयांच्या बनावट नोटाचं प्रकरण फडणवीस यांच्यामुळेच दाबलं गेलं, असेही त्यांनी म्हटले.
मुंबईत झालेल्या 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांसह दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्यांकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक व कुटुंबीयांनी कवडीमोल भावात कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी मंगळवारी केला. त्यानंतर मलिकांनी स्पष्टीकर दिलंही, आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर येऊन फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. मुन्ना यादव आणि हैदर आझम यांच्या नावाचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपींना सरकारी खात्याचे प्रमुख कसं बनवले, असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला आहे.
मुन्ना यादव हा नागपूरचा कुख्यात गुंड असून हत्येसह अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तो दहशत निर्माण करणारा तुमचा मित्र कसा?, तोच मुन्ना यादव कन्स्ट्रक्शन वर्कर्स बोर्डचा अध्यक्ष कसा? तुमच्या गंगेत न्हाऊन तो पवित्र झाला होता का, असे अनेक प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केले आहेत. तसेच, हैदर आझमला मौलाना आझाद फायनान्स महामंडळाचे अध्यक्षपद कसकाय मिळाले हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो की नाही, त्याची दुसरी पत्नी बांगलादेशी आहे की नाही, असाही सवाल मलिक यांनी विचारला आहे. पोलीस तपास सुरू केला, बंगाल पोलीसने ते बनावट कागदपत्र ठरवले. त्यावेळी, मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन तुम्ही ते प्रकरण दाबलं की नाही, असे अनेक प्रश्न नवाब मलिक यांनी फडणवीस यांना विचारले आहेत. मलिक यांच्या या आरोपावर आता फडणवीस काय उत्तर देणार, हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
रियाज भाटी तुमच्या टेबलावर कसा?
रियाझ भाटी कोण आहे? २९ ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्टमुळे सहार विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम गँगसोबत त्याचे संबंध असल्याच्या बातम्या आल्या. दोन पासपोर्टसोबत पकडला जाऊनही तो दोन दिवसांत सुटला. तो भाजपाच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये का दिसत होता? तुमच्या डिनर टेबलवर का दिसत होता. पंतप्रधान आले असताना रियाझ भाटीने त्यांच्यासोबतही फोटो काढले. तुमच्या आशीर्वादाने हा सगळा खेळ चालत होता, असा गंभीर आरोप मलिकांनी केला.