नवाब मलिकांची प्रकृती गंभीर, एक किडनी खराब झाली; जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 06:02 AM2023-02-25T06:02:57+5:302023-02-25T06:04:01+5:30
मलिक गेले एक वर्ष कारागृहात आहेत. त्यांची एक किडनी खराब झाली आहे आणि एका किडनीवर ते अवलंबून आहेत.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कॅबिनेटमंत्री नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे मान्य करत, उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी घेण्यास मान्य केले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेली कुर्ला येथील भूखंड बाजारदरापेक्षा अत्यल्प किमतीत घेतल्याचा आरोप मलिक यांच्यावर आहे. या प्रकरणी मलिक यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अटक केली.
पीएमएलए कायद्यांतर्गत मलिक ‘आजारी व्यक्ती’च्या व्याख्येत येतात का, असा प्रश्न गेल्या सुनावणीत न्या.मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने मलिक यांचे वकील व ईडीला केला होता. शुक्रवारी न्यायालयाने मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे मान्य करत, त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचे मान्य केले.
गुणवत्तेच्या आधारे याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शविण्यापूर्वी न्या.कर्णिक यांनी म्हटले होते की, जामीन अर्जावर तातडीची सुनावणी घेणे आवश्यक आहे की नाही, हे ठरविण्यासाठी न्यायालयाला मालिकांच्या वैद्यकीय स्थिती गंभीर आहे का, हे जाणणे आवश्यक आहे. मलिक यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयाला सांगितले की, मलिक गेले एक वर्ष कारागृहात आहेत. त्यांची एक किडनी खराब झाली आहे आणि एका किडनीवर ते अवलंबून आहेत. मात्र, ती किडनीही कमजोर झाली आहे. मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे न्यायालयाने मान्य केले.