मुंबई - माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची वैद्यकीय कारणास्तव २ महिन्यांच्या जामीनावर सुटका झाली आहे. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या दीड वर्षापासून ते तुरुंगात असून आजारपणामुळे रुग्णालयात उपचार घेत होते. सोमवारी सायंकाळी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर, राष्ट्रवादीतील दोन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांनी मलिक यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे, ते नेमके कोणत्या गटात जाणार हा प्रश्न आहे. त्यावर, आता स्वत: नबाव मलिक यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली. तर, आज प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर अजित पवार यांनीही त्यांची भेट घेतली. त्यामुळे, ते कोणत्या गटात जाणार याची चर्चा होत आहे. मात्र, ते तुर्तात कुठल्याही गटात किंवा पक्षात न जाता केवळ प्रकृतीवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. ''मी कोणत्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहणार आहे'', अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. त्यामुळे, नवाब मलिक कोणत्या गटात जाणार हे अद्यापही अनुत्तरीतच म्हणावे लागेल. कारण, मूळ राष्ट्रवादी कोणती, हाही प्रश्नच आहे.
''गेल्या १८ महिन्यांच्या काळात माझ्या कुटुंबासह मला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मूत्रपिंडाच्या गंभीर आजारामुळे मलाही त्रास सहन करावा लागला. सध्याच्या घडीला आरोग्याची काळजी घेणं, हे माझ्यासाठी प्राधान्य आहे. शहरातील सर्वात चांगल्या डॉक्टरांकडून मी उपचार घेणार आहे. पुढील महिनाभरात माझी प्रकृती सामान्य होईल, अशी मला आशा आहे'', असंही मलिक यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितल आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांचे कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या भेटीला जात होते. त्यामुळे मलिक तुरुंगातून बाहेर आल्यावर अजित पवार गटासोबत जाणार असल्याचे तर्क लावले जात होते. तर, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासमवेतही त्यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळे, ते शरद पवारांना सोडणार नाहीत, अशीही चर्चा आहे. आता, मलिक कोणत्या गटासोबत जाणार, राजकीय चर्चा होत असताना, तुर्तास ते राष्ट्रवादीच्या कुठल्याही गटात किंवा पक्षात जाणार नाहीत. ते मूळ राष्ट्रवादीसोबत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
२५ ते ३० किलो वजन घटलं
मलिक यांचे मोठे भाऊ कप्तान मलिक यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. नवाब मलिक यांचं २५ ते ३० किलो वजन घटलं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितल्याचं कप्तान मलिक यांनी सांगितलं.