नवाब मलिकांच्या मालमत्तांवर टाच, मुंबईतील पाच फ्लॅट्स, उस्मानाबादमधील १४८ एकर जमीन तात्पुरती जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 05:53 AM2022-04-14T05:53:16+5:302022-04-14T05:53:55+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) पुन्हा एकदा दणका देत, त्यांच्या आठ मालमत्तांवर टाच आणली आहे.
मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) पुन्हा एकदा दणका देत, त्यांच्या आठ मालमत्तांवर टाच आणली आहे. त्यात कुर्ला, वांद्रेतील मालमत्तांसह उस्मानाबादच्या १४८ एकर जमिनीचा समावेश आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासह त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांच्या मालमत्ता, बेनामी संपत्तीतील आर्थिक बाबींच्या संबंधित मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडी तपास करीत आहे. कुर्ला येथील गवालिया कंपाउंड जमीन दाऊदची बहीण हसिना पारकर हिने बळकावली होती. नवाब मलिक यांनी ही मालमत्ता तिच्याकडून कमी भावात खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
सुप्रीम कोर्टात धाव
ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करीत नोंदवलेला गुन्हा आणि पीएमएलए न्यायालयाच्या आदेशाला नवाब मलिक यांनी हायकाेर्टात आव्हान दिले होते. हायकाेर्टाकडून दिलासा न मिळाल्याने त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
मलिक सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत.
ईडीकडून ‘या’ मालमत्ता जप्त
- कुर्ला येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील तीन एकरमध्ये पसरलेेल्या गवालिया कंपाउंडसह कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा
- तीन फ्लॅट्स आणि वांद्रे पश्चिमेतील दोन फ्लॅट्स
- उस्मानाबाद जिल्ह्यामधील १४८ एकर जमीन
उस्मानाबादची जमीन पडीकच
उस्मानाबाद तालुक्यातील जवळा दु. शिवारात असलेली १४७.७९४ एकर जमीन मलिक यांच्या पत्नी, मुली व मुलांच्या नावाने खरेदी केलेली आहे.
आळणी येथील शेतकरी वसंतराव मुरकुटे यांच्याशी २० डिसेंबर २०१३ रोजी हा खरेदी व्यवहार २ कोटी ७ लाख रुपयांना झाला. खरेदीपासून ही शेतजमीन पूर्णत: पडीक ठेवण्यात आली. हीच शेतजमीन त्यातील बंगल्यासह ईडीने जप्त केली.