मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिकांनी आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करत नोकरी बळकावल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. समीर वानखेडे(Sameer Wankhede) कुटुंब मुस्लीम असून स्वत:ला हिंदू असल्याचं दाखवत असल्याचा आरोप मलिकांनी केला. मलिकांच्या या आरोपावर वानखेडे कुटुंबीयांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.
आता या प्रकरणात नवाब मलिकांनी(Nawab Malik) आणखी एक गंभीर आरोप ट्विटरवरुन केला आहे. मलिकांनी ट्विट करत काहीजण या गाडीत बसून मागील काही दिवसांपासून माझ्या घराची आणि शाळेची रेकी करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्यावी. जे लोक या फोटोत आहेत त्यांना माझं म्हणणं आहे. जर माझ्याविषयी माहिती हवी तर मला येऊन भेटावं. मी सगळी माहिती देईन असं त्यांनी सांगितले आहे.
९ डिसेंबरपर्यंत वानखेडे कुटुंबीयांविरोधा विधान करणार नाही
मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल न्यायमूर्ती पीठाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मनाई आदेश न काढल्याने ज्ञानदेव वानखेडे यांनी खंडपीठासमोर अपील याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी पार पडली. त्यावेळी ९ डिसेंबरच्या पुढील सुनावणीपर्यंत वानखेडे कुटुंबाविरोधात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणतेही सार्वजनिक विधान करणार नसल्याची हमी नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाला द्यावी लागली आहे.
‘नवाब मलिक यांनी कोणत्याही मंचाकडे तक्रार केली होती का? तसे नसेल केले तर ट्विट करून ते काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते? की हे केवळ प्रसिद्धीपोटी? की मीडिया ट्रायल? जात दाखल्याबाबत आक्षेप होता तर त्याविषयी तक्रार का केली नाही?’ अशी उच्च न्यायालयाकडून मलिकांच्या वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती केली. नवाब मलिक यांना अखेर ज्ञानदेव वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात पुढील सुनावणीपर्यंत कोणतेही सार्वजनिक विधान न करण्याची किंवा ट्विट न करण्याची हमी मुंबई उच्च न्यायालयात द्यावी लागली आहे.