सरकारविरोधात बोलल्यामुळेच माझ्यावर नक्षलवादाची कारवाई - आनंद तेलतुंबडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 07:13 AM2019-02-05T07:13:21+5:302019-02-05T07:13:39+5:30
लोकशाही अधिकारासाठी आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात बोलल्यामुळेच आपल्यावर नक्षलवादाची कारवाई झाली, असे डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी सांगितले.
मुंबई - लोकशाही अधिकारासाठी आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात बोलल्यामुळेच आपल्यावर नक्षलवादाची कारवाई झाली, असे डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघाने सोमवारी पत्रकार भवनमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. न्यायसंस्था व संविधानावर आपला पूर्ण विश्वास असून तेच आपली सुटका करतील, असा विश्वासही तेलतुंबडे यांनी व्यक्त केला.
तेलतुंबडे यांनी आपल्याविरोधात षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप केला. मात्र हे षड्यंत्र कोण रचत आहे, त्याचे नाव घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. तेलतुंबडे म्हणाले की, लोकशाही अधिकारांवर बोलणाऱ्याला नक्षलवादी ठरविण्यात येत आहे. मुळात शहरी नक्षलवाद असा प्रकारच नाही. नक्षलवाद ग्रामीण भागात फोफावलेला आहे. ज्या एल्गार परिषदेवरून नक्षलवादाचे आरोप झाले, त्याच्याशी आपला काडीचाही संबंध नाही. मुळात एल्गार परिषदेच्या समितीवर आपली नियुक्ती करणाºया न्यायमूर्ती पी.बी. सावंत व बी.जे. कोळसे-पाटील यांनीही याआधीच हे स्पष्ट केलेले आहे. तरीही पुणे पोलिसांनी तथाकथित पत्र सादर करत फ्रान्समधील दौºयासाठी माओवाद्यांनी पैसा पुरवल्याचा अजब दावा केला. त्याचा निषेध आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंदवला असून खुद्द फ्रेंच दूतावासानेही नाराजी व्यक्त केली आहे.
अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर आज सुनावणी
डॉ. आनंद तेलतुंबडे यांना केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करीत विशेष न्यायालयाने त्यांना तातडीने सोडण्याचे आदेश दिले. मात्र, पुणे न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी आहे.