Join us  

नाईक परिवाराकडे १२ वर्षे महापौरपद

By admin | Published: March 21, 2015 12:57 AM

महापालिकेच्या २० वर्षांच्या वाटचालीमध्ये महापौर पदावर नाईक परिवाराचाच वरचष्मा राहिला आहे. १२ वर्षे परिवारातील चार सदस्यांनी महापौर होण्याचा मान मिळविला आहे.

नामदेव मोरे - नवी मुंबई महापालिकेच्या २० वर्षांच्या वाटचालीमध्ये महापौर पदावर नाईक परिवाराचाच वरचष्मा राहिला आहे. १२ वर्षे परिवारातील चार सदस्यांनी महापौर होण्याचा मान मिळविला आहे. उर्वरित आठ वर्षांत पाच जणांना संधी मिळाली असून, त्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेवर स्थापनेपासून माजी मंत्री गणेश नाईक यांचे वर्चस्व आहे. पक्ष कोणताही असो सत्ता नाईकांचीच असे समीकरण तयार झाले आहे. १९९२ मध्ये महानगरपालिकेची स्थापना झाली व १९९५ मध्ये पहिली निवडणूक झाली. निवडणुकीनंतर नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजीव नाईक यांची महापौरपदी वर्णी लागली. सर्वात तरुण महापौर म्हणून त्यांची लिम्का बुकमध्ये नोंद झाली होती. तेव्हा महापौरपदाचा कार्यकाळ एक वर्षाचा होता. यानंतर सुषमा दंडे यांना शिवसेनेने महापौर बनविले. त्यांनी कामकाजावर स्वतंत्र ठसा उमटविला होता. यानंतर नारायण राणे समर्थक चंदू राणे यांना सेनेने महापौर बनविले. दरम्यान, गणेश नाईक यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला व स्थानिक आघाडी तयार केली. या आघाडीच्या माध्यमातून विजया म्हात्रे व नंतर नाईक यांचे बंधू तुकाराम नाईक महापौर झाले. दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर महापौरपद अडीच वर्षांसाठी राखीव झाले. पूर्ण पाच वर्षे संजीव नाईक यांनी महापौरपद भूषविले. याच काळात त्यांनी मोरबे धरण विकत घेण्याचा निर्णय घेतला व पालिकेचा पाणीप्रश्न पुढील ५० वर्षांसाठी संपविला. मोरबे धरणासाठी त्यांचा कार्यकाळ कायमस्वरूपी लक्षात राहील. तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांचा पालिकेच्या राजकारणात प्रवेश झाला. राष्ट्रवादीने मालमत्ता व पाणी बिलात २० वर्षे वाढ न करण्याची घोषणा केली. यामुळे पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले. परंतु महापौरपद राखीव झाल्यामुळे नाईक यांचे महापौर होण्याचे स्वप्न भंगले. पहिल्या अडीच वर्षांत मनीषा भोईर व नंतर अंजनी भोईर यांना संधी देण्यात आली. याच काळात स्कूल व्हिजन, तलाव व्हिजन, उद्यान व्हिजनचा प्रश्न मार्गी लागला. पालिका मुख्यालय, डॉ. आंबेडकर भवन, वंडर्स पार्क,रॉक गार्डन ही महत्त्वाची कामे याच काळात सुरू झाली. यामुळे पालिकेसाठी ही पाच वर्षे कायमस्वरूपी लक्षात राहणार आहेत. चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गणेश नाईक यांचे पुतणे सागर नाईक बिनविरोध निवडून आले व थेट महापौर बनले.नवी मुंबई महापालिकेचे आतापर्यंतचे महापौरच्संजीव नाईक (तीन वेळा) , सुषमा दंडे, चंदू राणे, विजया म्हात्रे, तुकाराम नाईक, मनिषा भोईर, अंजनी भोईर, सागर नाईक (दोन वेळा)