कमलाकर कांबळे, नवी मुंबईसायबर सिटीचे नायक माजी मंत्री गणेश नाईकच असल्याचे गुरुवारी पुन्हा एकदा सिद्ध झले. नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका निवडणुकीत ५२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. असे असले तरी सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला आणखी चार जागांची आवश्यकता असून अपक्षांमध्ये त्यांनी पुरस्कृत केलेल्या दोन अन् दोन बंडखोरांचा समावेश आहे.महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी १११ प्रभागांसाठी मतदान झाले. गुरुवारी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. पहिल्याच फेरीत भाजपच्या उज्ज्वला विकास झुंजाड यांनी राष्ट्रवादीच्या हेमलता भोलानाथ ठाकूर यांचा अनपेक्षित पराभव करून आपल्या पक्षाचे खाते उघडले. त्यानंतर मात्र भाजपला प्रत्येक प्रभागात विजयासाठी संघर्ष करावा लागला. याचा परिणाम म्हणून केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कोपरखैरणेतील प्रभाग क्रमांक ५१ मध्ये राष्ट्रवादीच्या वैशाली म्हात्रे-नाईक यांनी भाजपचे युवा नेते वैभव नाईक यांच्या पत्नी वैष्णवी नाईक यांचा अवघ्या ७१ मतांनी पराभव केला. तर प्रभाग क्रमांक ४० मधून शिवसेनेचे शिवराम पाटील यांनी राष्ट्रवादीचे केशव म्हात्रे यांचा पराभव करून सलग चौथ्यांदा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. प्रभाग क्रमांक ६० मधून काँग्रेसचे अविनाश लाड यांनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे यांचा दणदणीत पराभव केला. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक ६४ मधून निवडणूक लढलेल्या त्यांच्या सूनबाई अनुश्री मोरे यांनाही राष्ट्रवादीच्या विद्या गायकवाड यांनी धूळ चारली. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या वाशीतील प्रभाग क्रमांक ६३ मधून भाजपच्या दयावती शेवाळे यांनी काँग्रेसच्या दर्शना कौशिक यांचा पराभव केला. विशेष म्हणजे येथून विजयाचे दावेदार समजले जाणारे माजी उपमहापौर भरत नखाते यांना मतदारांनी नाकारल्याने ते थेट तिसऱ्या क्रमांकावर गेले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत या प्रभाग क्रमांक ७७ मधून तर युवाध्यक्ष निशांत भगत यांची आई फशीबाई करसन भगत व पत्नी रूपाली भगत या अनुक्रमे प्रभाग क्रमांक ६५ व ७८ मधून विजयी झाल्या.दिघ्यातील प्रभाग ७ मधून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले हे विजयी झाले आहेत. तर प्रभाग क्रमांक २३ मधून त्यांचे पुत्र ममित चौगुले हे सुद्धा विजयी झाले आहेत. तर मनोहर मढवी यांच्यासह त्यांची पत्नी विनया मढवी आणि मुलगा करण मढवी हे अनुक्रमे प्रभाग क्रमांक १८, १६ आणि २१ मधून विजयी झाले आहेत. माजी सभागृह नेते अनंत सुतार हे प्रभाग क्रमांक १४ मधून पराभूत झाले आहेत.
नाईकच नायक!
By admin | Published: April 24, 2015 3:13 AM